एकनाथ शिंदेंच्या बंडाला भाजपचा पाठिंबा, शिंदेंनी स्वतः दिली कबुली
गुरूवार, 23 जून 2022 (21:18 IST)
गुवाहाटीतल्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलात गुरुवारी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची बंडखोर आमदारांच्या गटनेतेपदी निवड करण्यात आलीय.
त्याची माहिती देण्यासाठी शिंदेच्या कार्यालयातून काही फोटो आणि व्हीडिओ जारी करण्यात आले आहेत. त्यात शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर ते आमादारांचे आभार मानत आहेत.
त्यावेळी जे काय सुखदुःख आहे ते आपल्या सर्वांच एकच आहे. काही असेल त्याला आपण एकजुटीने सामोरं जाऊ. विजय आपल्याच आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हे सांगतानाच त्यांनी भाजपचं नाव घेतलं नाही पण त्यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांचा त्यांना कसा पाठिंबा आहे हे विषद करून सांगितलं आहे.
"ते नॅशनल पार्टी आहे. ते महाशक्ती आहे. त्यांनी मला सांगितलेलं आहे तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे अत्यंत ऐतिहासिक निर्णय आहे आणि तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. कुठचंही काही लागलं तर कधीही कमी पडणार नाही याची प्रचिती आपल्याला जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा सगळ्यांना येईल," असं एकनाथ शिंदे गुवाहाटीतल्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलात त्यांच्या गोटातल्या आमदारांना संबोधित करताना म्हटले आहेत.
मुंबईत गुरुवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेतही याच व्हीडिओचा दाखला देत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या या बंडामागे भाजपच असल्याचा दावा केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केलेली ती नॅशनल पार्टी भाजपच आहे हे स्पष्ट करण्यासाठी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत देशातल्या 6 राष्ट्रीय पक्षांची यादी वाचून दाखवली. "यात भाजप, मायावतींचा पक्ष वगैरे आहे. यात कुणाचा पाठिंबा मिळू शकतो?" असा सवाल करत हा शक्तीशाली राष्ट्रीय पक्ष भाजपच असल्याच त्यांनी म्हटलंय.
दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र यामागे भाजप नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर बोलताना "अजित पवार यांनी भाजपबद्दलचं वक्तव्य महाराष्ट्राची आणि मुंबईची परिस्थिती पाहून वक्तव्य केल असेल. सुरतची आणि आसामची परिस्थिती आम्हाला माहीत आहे. सुरतमध्ये त्या आमदारांची व्यवस्था कोण पाहतय त्यांच्याशी अजित पवारांचा परिचय नाही. भाजपचे सी. आर. पाटील व्यवस्था बघतायेत. त्यांच्याशी माझा परिचय आहे," असं पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान आपल्या गटात असलेल्या आमदारांची यादी शिंदे यांच्या कार्यालयाने सर्व प्रसारमाध्यमांना पाठवून दिली. थोड्या वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलात उपस्थित असलेल्या आमदारांचा एक व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार स्पष्टपणे पाहिले जाऊ शकतात.
एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने पाठवलेल्या आमदारांच्या यादीनुसार शिवसेनेचे एकूण 37 आमदार त्यांच्यासोबत आहेत. तर 9 अपक्ष आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.