Beating Sushma Andhare : ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. बंडखोरी होऊन जवळपास अकरा महिने पूर्ण झाले आहेत. तरीही ठाकरे गटाची गळती थांबत नाहीये. दररोज कोणता ना कोणता नेता शिंदे गटात प्रवेश करत आहे. असं असताना उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत.
आता बीडमध्ये ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. येथील ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. ठाकरे गटाचे बीडमधील स्थानिक नेते गणेश वरेकर आणि जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांच्यात वाद झाला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासमोरच या दोन नेत्यात वाद झाला आहे. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांनी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या आहेत. याबाबतचा दावा अप्पा जाधव यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत केला आहे.
संबंधित व्हिडीओत अप्पा जाधव म्हणाले, “सुषमाताई अंधारे सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या पैसे मागत आहेत. आपल्या कार्यलयात एसी, फर्निचर आणि सोफा बसवण्यासाठी त्या पदाधिकाऱ्याकडून पैसे घेत आहेत. त्या माझंही पद विकत आहेत. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. रक्ताचं पाणी करत आहे. माझ्या लेकरा-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करून मी पक्ष वाढवत आहे. याकडे सुषमा अंधारेंचं लक्ष नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंचा आणि माझा वाद झाला. या वादात मी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या.”