कालिका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. आज (1 जून) सकाळी नऊ वाजता बँक उघडून नियमितपणे कारभार सुरु झाला होता. मात्र सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन तरुण दुचाकीवरुन बँकेत आले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र होते. या शस्त्राच्या बळावर त्यांनी व्यवस्थापकासह पाच ते सहा कर्मचार्यांना धमकावले.
यावेळी दरोडेखोरांनी व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार देखील केला. यानंतर कोयत्याचा धाक दाखवत त्यांनी बँकेतील रोकड घेऊन तिथून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार अवघ्या काही मिनिटांत घडला. चोरटे बँकेत घुसल्यापासून रोख रक्कम पळवून नेण्यापर्यंतची थरार अवघ्या काही मिनिटांचा होता. त्यांनी बँकेतील अंदाजे 15 लाखांपेक्षा जास्त रुपयांची रोकड लांबवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेत धाव घेतली. जखमी झालेल्या व्यवस्थापकाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसीचे प्रभारी शंकर शेळके यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि आढावा घेतला. याशिवाय श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून आरोपींचा शोध सुरु आहे.