तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे भाजपच्या बी टीमसारखे वागत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच बीआरएसचा महाराष्ट्रात विस्तार करण्याच्या प्रयत्नांचा कोणताही परिणाम राज्याच्या राजकारणावर महाविकास आघाडीवर होणार नसून बीआरएसच्य़ा महाराष्ट्र प्रवेशाचा परिणाम तेलंगाणावर मात्र नक्की होणार असल्याचा ईशाराही संजय राउतांनी दिला.
माध्यमांनी के. चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये प्रवेशावर छेडले असता त्यांनी, “…त्याचा परिणाम तेलंगणाच्या राजकारणावर होईल. केसीआरजी अशीच नौटंकी करत राहिल्यास ते तेलंगणातच हरतील. तेलंगणात हरण्याच्या भीतीनेच त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे,” असे ते म्हणाले. केसीआर गाड्यांच्या मोठ्या ताफ्यासह दाखल झाल्यावर दिल्लीत त्यांचे अनेक नेते काँग्रेसमध्ये सामील झाल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “ही लढत बीआरएस आणि काँग्रेसमध्ये आहे. आम्ही दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करू शकतो. पण तुम्ही महाराष्ट्रात हा बदला घेण्याचा प्रयत्न करत असाल तर मी म्हणेन की तुम्ही (BRS) भाजपसाठी काम करत आहात. महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. येथे महाविकास आघाडी मजबूत आहे.”