पालघरच्या झाई आश्रम शाळेतील तब्बल 7 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण

रविवार, 17 जुलै 2022 (19:04 IST)
पालघर:-  झाई आश्रम शाळेतील एका विद्यार्थिनीचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर दाखल केलेल्या १३ विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला झीका तर इतर सात विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अनुषंगाने या आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर पुढील 10  दिवस देखरेख ठेवली जाणार आहे. झीका आजाराबाबत सर्वेक्षण व देखरेख करण्यासाठी केंद्रीय समिती डहाणू तालुक्यात दाखल झाली असून स्थानीय आरोग्यवस्थेबरोबर पाच किलोमीटर परिसरातील गर्भवती महिलांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे.
 
झाई आश्रम शाळेतील एक विद्यार्थिनीचा 9  जुलै रोजी मृत्यू झाल्यानंतर डहाणू कुटीर रुग्णालयात दाखल केलेल्या उर्वरित 13 विद्यार्थ्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.
 
त्यात एका विद्यार्थ्याला झीका झाल्याचे निदान झाल्याने झाई आश्रम शाळेच्या आसपासच्या पाच किलोमीटर परिघातील सर्व गर्भवती महिलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच त्या परिसरातील डास, अळ्या आणि कीटक प्रयोगशाळेत पाठवले असून ताप, सर्दी, खोकला तसेच श्वसनाचे विकार असणाऱ्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
 
दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. आता आश्रम शाळेतून घरी गेलेल्या सर्व 192 विद्यार्थ्यांच्या प्रकृतीकडे पुढील दहा दिवस लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांची गावनिहाय यादी तयार करून संबंधितांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 
दरम्यान स्वाइन फ्लू हा इन्फ्लुएंझा एचा प्रकार असून या आजारामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची भीती नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने कळवले आहे. या आजारासाठी आवश्यक असणाऱ्या टॅमीफ्लू गोळ्या घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात इतरत्र इन्फ्ल्यूंझा व श्वसनाच्या विकाराचे निदान झालेल्या रुग्णांची रक्त तपासणी करून स्वाइन फ्लूचा जिल्ह्यातील प्रसार अभ्यासला जाणार आहे.
 
स्वाइन फ्लूची लक्षणे
जेव्हा लोकांना स्वाइन फ्लूच्या विषाणूची लागण होते, तेव्हा त्यांची लक्षणे सहसा हंगामी इन्फ्लूएंझा सारखीच असतात. यामध्ये ताप, थकवा आणि भूक न लागणे, खोकला आणि घसा खवखवणे यांचा समावेश होतो. काही लोकांना उलट्या आणि जुलाब देखील होऊ शकतात. 
 
खबरदारीचे पालन करावे: 
वारंवार साबण आणि पाण्याने हात धुवा
खोकताना किंवा शिंकताना, शक्य असल्यास, आपले तोंड आणि नाक टिश्यूने झाकून ठेवा
वापरलेल्या ऊतींची त्वरित आणि काळजीपूर्वक विल्हेवाट लावा. त्यांना पिशवीत ठेवा आणि नंतर कंटेनरमध्ये टाका
कठोर पृष्ठभाग (उदा. दरवाजाचे हँडल) नियमितपणे स्वच्छ करा
मुलांनी या सल्ल्याचे पालन केल्याची खात्री करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती