आर्मी ऑफिसरची पुणे रेल्वे स्टेशनवर रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

सोमवार, 19 एप्रिल 2021 (07:56 IST)
भारतीय सैन्य दलात ब्रिगेडियर असणाऱ्या एका अधिकाऱ्याने पुणे रेल्वे स्थानकावर  उद्यान एक्सप्रेस समोर उडी मारून आत्महत्या केली. अनंत नाईक असे आत्महत्या केलेल्या ब्रिगेडियरचे नाव आहे. ते एएफएमसी मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन विभागाचे प्रमुख होते.
 
अनंत नाईक हे मूळचे भुवनेश्वर येथील रहिवासी आहेत. पुण्यातील एएफएमसीमध्ये ते ऍडमिनिस्ट्रेशन विभागाचे प्रमुख होते. आज सकाळी शासकीय गाडी घेऊन पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. यावेळी त्यांनी सोबत असलेल्या चालकाला एमसीओतुन जाऊन येतो असे सांगितले.
 
त्यानंतर त्यांनी पुणे रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म नंबर तीन येथे उद्यान एक्सप्रेस गाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्याआधी त्यांनी पुणे रेल्वे स्थानकावरच चेन्नई एक्सप्रेस खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो यशस्वी झाला नाही असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
 
दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे आणि समुद्रातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
 
त्यानंतर अनंत नाईक यांच्या मुलाला घटने विषयी माहिती देण्यात आली. त्यांच्या मुलाने आम्ही येईपर्यंत शवविच्छेदन करू नये अशी विनंती केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती