सचिन तेंडुलकरच्या पत्नीने दिली गावाला भेट

बुधवार, 24 जानेवारी 2018 (11:31 IST)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर यांनी करंजी गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले. अंजली तेंडुलकर यांनी करंजीस अल्पावधीत दोनदा भेट दिली आहे. त्यांना करंजी परिसराने जणू भुरळच घातल्याचे दिसून येते. 
 
रासायनिक शेती केल्याने जमिनीची सुपिकता कमी होते. सेंद्रिय शेती ही नैसर्गिक आहे, ही शेती करण्यासाठी परिसरातील शेतकर्‍यांनी पुढाकार घ्यावा. मी लहान मुलांची डॉक्टर असल्यामुळे पुढील वेळी आल्यावर मुलांच्या व स्त्रियांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करेन, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. करंजी परिसरातील भट्टीवाडी येथील शेतकरी सुरेश सीताराम क्षेत्रे व महादेव गाडेकर हे करीत असलेल्या सेंद्रिय शेतीची त्यांनी पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी पुढीलवेळी येताना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना बरोबर घेऊन येण्याची विनंती त्यांनी मान्य केली. यावेळी सेंद्रिय शेतीवर संशोधन करणार्‍या संस्थेच्या कालिया मॅडम तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी 
उपस्थित होते. गावातील दिलीप अकोलकर व कैलास थोरात या शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेती करण्याची तयारी दाखविली. यावेळी करंजीच्या सरपंच नसिम रफिक शेख, सुनील साखरे, र‍फिक शेख, उपसरपंच शरद अकोलकर, छगनराव क्षेत्रे, मच्छिंद्र गाडेकर, महादेव गाडेकर, राजेंद्र पाठकसह मोठ्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होत्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती