नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (08:13 IST)
राष्ट्रीय महामार्गाच्या  कामात शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून कामे रखडली असल्याचा आरोप पत्राच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना केला आहे. नितीन गडकरींच्या या पत्रानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर  टीका होत आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गडकरी यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पहावे लागले असे अजित पवार यांनी सांगितले.
 
अजित पवार म्हणाले, गेल्या 30 वर्षापासून मी समाजकारणात काम करतोय, त्यामुळे मी नेहमी सांगतो की हा पैसा जनतेचा असतो. जनतेच्या पैशाचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे, होणाऱ्या कामाचा दर्जा राखला पाहिजे. कामाचा दर्जा चांगला राखला जात नसेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाई  झाली पाहिजे. परंतु जर एखाद्या ठेकेदार चांगले काम करत असतानाही काही जण एखाद्या राजकीय पक्षाचा आधार घेऊन, मिळालेल्या पदाचा आधार घेऊन जर त्रास देत असेल तर तो ही त्रास ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. या संदर्भात पत्र आता थेट मुख्यमंत्र्यांनाच गेले आहे.
 
मी पावणेदोन वर्षा झाले मुख्यमंत्र्यांसोबत काम करीत आहे. त्या दरम्यान अनेक उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांवेळी त्यांचे एकच सांगणे असते. कामाचा दर्जा चांगला ठेवा हा कटाक्ष त्यांचा असतो. जेव्हा अधिकाऱ्यांसोबत बैठक होते. तेव्हा पर्यावरण, कामाचा दर्जा , विकास कामादरम्यान वृक्षतोड कशी टाळता येईल यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न असतो.त्यामुळे या प्रकरणात ते लक्ष घालून शहानिशा करतील, याबाबत मला 100 टक्के खात्री आहे. त्यामधून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्यास मदत होईल. कुठल्या कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने किंवा नागरिकाने विकास कामात अडथळा आणता कामा नये, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती