आगामी निवडणुकीत सेना भाजप सारख्या जातीयवादी विचारसरणी असलेल्या पक्षांना रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समविचारी पक्षांशी बोलणी करून आघाडी करणार असल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते आज राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी बोलतांना अजित पवार पुढे म्हणाले कि, कुठल्याही निवडणुकीत जर एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत असेल तरच त्यांना चांगला कारभार करता येतो. त्याचा परिणाम ही विकासातून दिसून येतो. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पुन्हा एकदा झळाळी देऊन बहुमत प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी अहोरात्र काम करावे असे सांगून पुणे-पिंप्री चिंचवडच्या धर्तीवर नाशिक महानगरपालिकेचा विकास करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. आघाडी सरकारच्या कालावधीत माजी कृषिमंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची विकास कामे केली आहे. मात्र सध्या या विकास कामांना ब्रेक लागल्याचे आहे. तसेच नाशिक शहरात गुन्हेगारी देखील मोठया प्रमाणात वाढत असून त्याचवर प्रशासनाचा वचक राहिला नसल्याची टीका देखील त्यांनी केली.