सुशांत सिंग, दिशा सालियान प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेविरोधात आदित्य ठाकरे उच्च न्यायालयात

गुरूवार, 19 ऑक्टोबर 2023 (14:42 IST)
सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणार्‍या जनहित याचिकेमध्ये हस्तक्षेप करावा यासाठी आदित्य ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
 
आदित्य ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायलयात दाखल केलेल्या 80 पानांच्या याचिकेची प्रत बीबीसीला मिळाली असून बीबीसीने त्याचे पुनरावलोकन केले आहे.
 
वकील राहुल आरोटे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेत हस्तक्षेप करावा यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आदित्य उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे."
 
आरोटे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकांमध्ये हस्तक्षेप करण्यात यावा असं त्यांचं म्हणणं आहे
 
आरोटे यांनी पुढे सांगितलं की, "या जनहित याचिकांवर कोणताही आदेश देण्यापूर्वी न्यायालयाने त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं अशी विनंती ठाकरे यांनी केली आहे."
 
Supreme Court and High Court Litigants Association चे अध्यक्ष राशिद खान पठाण यांनी आदित्य ठाकरेंविरोधातील जनहित याचिका दाखल केली होती.
 
आदित्य ठाकरेंच्या याचिकेत म्हटले आहे की, जनहित याचिकेत कोणतेही जनहित नसून वैयक्तिक आकसातून, खोटा प्रचार करण्यासाठी आणि राजकीय फायदा मिळवण्यासाठी, विशेषत: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
 
बीबीसीने या याचिकेची प्रत मिळवली असून त्यात या गोष्टी उघड झाल्या आहेत.
 
आदित्य ठाकरे यांनी आपल्या याचिकेत असं म्हटलंय की, "त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध वैयक्तिक सूडबुद्धीने कारवाई करता यावी तसेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पुन्हा एकदा त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर चिखलफेक करता यावी, बिनबुडाचे आरोप करता यावे यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
 
या विषयामुळे सामान्य लोकांच्या मनात जागा निर्माण करून राजकीय फायदा मिळवण्याचा हेतू आहे."
 
महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री असल्याने ठाकरे यांच्या प्रतिष्ठेवर या आरोपांचा विपरीत परिणाम होत आहे. ते त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांवरील आरोपांचा प्रतिकार करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी करत असल्याचे अर्जात म्हटले आहे.
 
जनहित याचिकांमध्ये नमूद केलेले वाद हे भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री नारायण राणे, रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या खोट्या आरोपावर आधारित असल्याचं अर्जात म्हटलं आहे.
 
सोबतच उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणे आणि गोस्वामी यांना बेकायदेशीर कामांसाठी अटक करण्यात आली होती. त्यामुळे ते सूडबुद्धीने वागत आहेत.
 
आदित्य ठाकरेंच्या या याचिकेत असंही म्हटलंय की, दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआय, महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांनी आधीच पूर्ण केली आहे.
 
त्यामुळे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका अनावश्यक आहेत. आदित्य ठाकरेंच्या अर्जात या याचिकांमध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती