8 killed by lightning in Chandrapur चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात दुपारी धो-धो पाऊस बसरला. जोरदार वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांचीच दाणादाण उडाली. २ तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक भागात पाणी साचले असून नाले ओसंडून वाहत आहेत तर अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. या दरम्यान, जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज सोकळून ८ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले आहेत. वीज कोसळून अनेकांचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पोभूर्णा तालुक्यातील मौजे वेळवा माल येथे शेतात काम करीत असताना वीज पडून एक महिला मृत पावली तर इतर ६ जण जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालय पोभूर्णा येथे भरती करण्यात आले. अर्चना मोहन मडावी (२८) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे तर खुशाल विनोद ठाकरे (३१), रेखा अरविंद सोनटक्के (४५), राधिका राहुल भंडारे (२२), सुनंदा नरेंद्र इंगोले (४५), वर्षा बिजा सोयाम (४०), रेखा ढेकलू कुळमेथे (५५), खुशाल विनोद ठाकरे, वर्षा बिजा सोयाम आणि रेखा ढेकलू कुळमेथे यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय पोभूर्णा येथे उपचार चालू आहेत.
दरम्यान, शफिया सीराजुल शेख रा. नांदेड ता. नागभीड (१७) शेतावर गेली असता वीज पडल्याने जखमी झाली. तसेच सोनापूर तुकुम (ता. नागभीड) येथील रहिवासी नाव रंजन जगेर्श्वर बल्लावार यांची १ म्हैस वीज पडून मरण पावली. यासोबतच कल्पना प्रकाश झोडे (४५), अंजना रुपचंद पुसतोडे (४८) दोघी रा. देलनवाडी ता. सिंदेवाही यांचा शेतात वीज अंगावर पडून मृत्यू झाला. तसेच सुनीता सुरेश डोंगरवार (३५) या जखमी झाल्या आहेत. तसेच कोरपना तालुक्यातील चनई बुज येथील पुरुषोत्तम अशोक परचाक (२७) आणि वन मजूर भारत लिंगा (५३) रा. चिवंढा यांचा वीज पडून मृत्यू झाला. तसेच आनंदराव मारुती पेंदोर (५२) जखमी झालेले आहेत. ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा येथील गीता ढोंगे यांचाही वीज पडून मृत्यू झाला. तसेच चारगाव येथे वीज पडून दोन शेळ््या तर बोरगाव मोकासा येथे दोन बैल मृत्युमुखी पडले.
नदी-नाल्यांना पूर, आज शाळांना सुटी
कोरपना तालुक्यात आज मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने जांभुळधरा-उमरहिरा, रूपापेठ मार्ग बंद झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालय आणि महाविद्यालय यांना उद्या सुटी जाहीर करण्यात आली.