'या' ५ जिल्ह्यांत एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्ण

बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (08:22 IST)
केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली आहे, एका-एका दिवसात ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे, गर्दी करून नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झाले आहे.राज्यातील ४ ते ५ जिल्ह्यातच एकूण रुग्णसंख्येच्या ७० टक्के रुग्णसंख्या आहे,त्यात अहमदनगर,रत्नागिरी,सातारा,मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे,त्यामुळे शिस्त पाळावीच लागेल,नियमांचे पालन करावेच लागेल तरच तिसरी लाट रोखता येईल असेही आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
 
एका दिवसात १२ लाखांपेक्षा अधिक लसीकरण
एका दिवसात १२ लाखांच्या वर लसीकरण करून आपण आपली क्षमता सिद्ध केली आहे, लस अजून उपलब्ध झाली तर १२ ते १४ लाख लसीकरण रोज करता येईल.त्यामुळे नागरिकांना सुरक्षितता देता येऊ शकेल आणि पर्यायाने तिसऱ्या लाटेची दाहकता कमी होईल. मोठ्या प्रमाणात लसीकरण करून तिसरी लाट थोपवायची असेल तर त्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या अधिसूचनांचे पालन करण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
 
आगामी गणेशोत्सवासाठी शुभेच्छा देतानाच शासनाच्या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्राला गर्दी टाळण्याची जाणीव करून दिली आहे,त्यामुळे येथील मंडळांनी, गणेश भक्तांनी शिस्तबद्धपणे कोविड नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन शेवटी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती