व्यावसायिकाला ६ कोटी ८० लाखाला गंडा; गुजरातमधील १५ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

शनिवार, 19 मार्च 2022 (08:06 IST)
नाशिकमधील व्यावसायिकाला तब्बल ६ कोटी ८० लाखाला गंडा घालणा-या गुजरातमधील १५ संशयितांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशिल भालचंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सचिन पुरुषोत्तमभाई वेलेरा (रा. भावकुंज सोसायटी, अहमदाबाद, गुजरात), वैभव गहलोत (सरदारपुरा, जोधपूर), किशन कांतेलिया, सरदारसिंग चौहान, ‘नीडल क्राफ्ट’ चा अधिकृत व्यक्ती, प्रविणसिंग चौहान, सुहास सुरेंद्रभाई माकवाल, निरवभाई महेशभाई विर्माभट, बिश्वरंजन मोहंती, राजबिरसिंग शेखावत, प्रग्येशकुमार विनोदचंद्र प्रकाश, संजयकुमार देसाई, सावनकुमार पारनेर,रिशिता शहा, विराज पांचाल यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
राजस्थान सरकारच्या पर्यटन विभागाच्या ‘ई-टॉयलेट’ जाहिरातीच्या ई-टेंडरींगच्या कामात गुंतवणूक केल्यास कोट्यावधीचा नफा होऊ शकतो, असे आमिष दाखवूनही फसवणूक जानेवारी २०१८ ते २०२० दरम्यान केली आहे. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयितांनी संगनमत करून विश्वास संपादन केला. राजस्थान सरकारच्या नावाने ई-टॉयलेट पर्यटन विभागाचे जाहिरातीसाठी ई-टेंडरचे संपूर्ण राज्याचे कामकाज समाविष्ट आहे. त्यात गुंतवणूक केल्यास कोट्यावधीचा नफा मिळू शकतो. असे खोटे आश्वासन देत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर २०१८ ते २०२० दरम्यान ३ कोटी ९३ लाख, ५४ हजार, ७८८ रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर करून घेतले. तसेच उर्वरीत रक्कम रोख घेतली. याप्रकरणी भादंवि ४२०, ४०६, ४६८, ४७१, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक संजय भिसे तपास करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती