राज्याचे माजी मुख्यमंत्री यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नांदेडमध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. असे असतानाचा आता नांदेडमधील काँग्रेसच्या तब्बल 55 माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश करताना आपण कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नसून कोणालाही सोबत नेणार नाही, असे म्हटले होते. पण आता त्यांच्या नांदेड मतदारसंघातील तब्बल 55 माजी नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. ज्यामुळे आता काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे दिसत नाहीये.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड महापालिकेच्या मागील निवडणुकीत निवडून आलेल्या 81 पैकी 73 नगरसेवक हे काँग्रेसचे होते. यापैकी 55 माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला नांदेड महापालिकेत मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता नांदेडमधील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्तेही भाजपाला पाठिंबा देताना दिसत आहेत. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे इतर आमदारही अशोक चव्हाण यांना पाठिंबा देतात का ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु, ज्या कार्यकर्त्यांना माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीत यायचे आहे त्यांचे स्वागत आहे. मी कोणालाही जबरदस्तीने माझ्यासोबत या अशी भूमिका घेतली नाही, आणि आजही घेणार नाही, असे अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.