नाशिकच्या मोबाईल डिलरकडून व्यावसायिकांना चार कोटींची फसवणुक

मंगळवार, 20 सप्टेंबर 2022 (08:57 IST)
अधिकाधिक नफ्याचे आमिष दाखवून औरंगाबादच्या आठ व्यावसायिकांना मेन रोडवरील एका मोबाईल डिलरकडून सुमारे चार कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी व्यावसायिक आदित्य राधेश्याम मालीवाल यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित डीलर्स विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नाशिक शहरातील मेनरोड परिसरातील वावरे लेन एका खाजगी कंपनीच्या संचालकविरुद्ध मालीवाल यांनी फिर्याद दिली आहे.
 
या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, औरंगाबादच्या व्यावसायिकांना ई- मेलद्वारे जादा नफ्याचे आमिष दाखविले. व लाखो रुपये उकळले. संशयितांने या बदल्यात कुठल्याही प्रकारच्या मोबाईलचा पुरवठा केला नाही. संबंधित मोबाईल कंपनीच्या मुख्य डिलर्स कडे चौकशी केली असता ही फसवणुकीची बाब उघड झाली. मोबाइलच्या मालाचा पुरवठा करण्यासाठी संशयित व्यावसायिक अनिल वासुदेव खेमानी, नीलम अनिल खेमानी, सीता वासुदेव खेमानी, वासुदेव राधाकीसन खेमानी आणि कंपनीचे व्यवस्थापक श्रीनाथ अहिरवाडकर यांनी आगाऊ रक्कम व्यवसायिकांकडून घेतली.
 
दरम्यान ऑगस्ट महिन्यात मोबाईल माल पुरवला नाही. तसेच उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली. यानंतर व्यवसायिकांनी मोबाईल कंपनीकडे याबाबत चौकशी केली असता, त्यांनी ही कंपनी आता आमची अधिकृत विभागीय वितरक नसल्याचे सांगून हात झटकले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नक्की काय घडलं:
संशयित खेमानी यांनी मालीवाल यांना अधिक नफ्याचे आमिष दाखवून सुपरमनी कंपनीत पैसे गुंतविण्यात सांगितले. त्यासाठी त्यांना 35 लाखांची मर्यादा ठरवून दिली. 1 जुलै 2022 रोजी खेमानी यांनी मालीवाल यांची संमती न घेता 12 लाख 64 हजार 754 व 10 लाख 51 हजार 181 आणि 10 लाख 84 हजार 065 रुपये कंपनीच्या बँक खात्यातुन अन्य खात्यात वर्ग करून घेतले. संशयित खेमानी यांना मालीवाल यांनी रक्कम खात्यातुन का वर्ग केली, असे विचारले असता त्यांनी नवीन स्कीम येणार आहे, त्यासाठी 80 ते 90 लाखांची गुंतवणूक करा, यापेक्षाही जास्त नफा होईल, असे सांगितले. मालीवाल जास्त नफ्याच्या अमिषापोटी स्वतः त्यांच्या खात्यात 70 लाख 08 हजार रुपयांचा भरणा केला. मालीवाल यांनी औरंगाबाद डीलर्सकडे चौकशी केली. तेव्हा त्यांची ही फसवणूक झाल्याचे कळले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती