नाशिक : नाशिक महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील पाडवा पटांगण, नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी पाडवा पटांगण पर्यावरण रक्षण या अंतर्गत पंचमहाभुते या विषयाला अनुसरुन तब्बल २५ हजार स्क्वेअर फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.
रांगोळी साकारतांना पर्यावरणाचा समतोल हा पंचमहाभूतांवर अवलंबून आहे, आपले शरीर, पृथ्वी तसेच संपूर्ण ब्रह्मांड हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे अशी आपली धारणा आहे. त्यामुळे पंचमहाभूतांचा समतोल बिघडला की पर्यावरणाचाही समतोल बिघडतो. पर्यावरण आणि पंचमहाभूतांचा परस्पर संबंध दाखवणारी ही महारांगोळी आहे.
रांगोळी मध्ये मधोमध पंचमहाभूतांचे बोधचिन्ह रांगोळीतून साकारण्यात आले आहे. तसेच सूर्य आणि पृथ्वी देखील साकारण्यात आली आहे. मानवी शरीर, पृथ्वी आणि संपूर्ण ब्रह्मांड हे पंचमहाभूतानी बनलेले आहे हे दाखवण्यासाठी रांगोळीमधे त्यांचा अंतरभाव केला आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडण्यासाठी आपणच जबाबदार आहोत हे दाखवण्यासाठी वृक्षतोड, वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, रासायनिक खतांचा अती वापर, जलप्रदूषण या गोष्टींचा अंतर्भाव असलेले रांगोळीचित्र रेखाटण्यात आले आहेत.