बीडमध्ये 2 शेतकऱ्यांची आत्महत्या

शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (09:33 IST)
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे खूप नुकसान झाले आहेत. मागील काही दिवसांपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे. यामुळे अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असताना बीडमधून दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. 
 
अतिवृष्टीमुळे शेतीचं झालेलं नुकसान सहन न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. भाऊसाहेब दशरथ पांढरे (वय-55) आणि योगेश वसंत खांडवे (वय-24) असं आत्महत्या करण्याऱ्या दोन शेतकऱ्यांची नावं आहेत. 
 
भाऊसाहेब पांढरे हे गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथील रहिवासी होते. ते अल्पभूधारक शेतकरी होते आणि त्यांनी घर बांधणीसाठी कर्ज घेतलं होतं. याशिवाय बँकेतून पीककर्ज देखील घेतलं होतं. पण अतिवृष्टीमुळे यांची पिकासह शेती खरडून वाहून गेली. आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतात कापूस आणि सोयाबीनचं नुकसान झालं. नैराश्यात पांढरे यांनी 1 ऑक्टोबर रोजी दुपारी आपल्या घराजवळील एका झाडाला गळपास घेऊन जीवन संपवलं. 
 
तर दुसऱ्या एका घटनेत कर्जाखाली दबून योगेश वसंत खांडवे या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं समजतं. खांडवे यांनी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आयुष्य संपवलं. या दोन्ही घटनांमुळे गावात शोककळा पसरली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती