दहावीच्या परीक्षेला सुरूवात

शुक्रवार, 1 मार्च 2024 (08:58 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (दि. १) सुरू होत आहे. परीक्षेसाठी २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधील १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तणावमुक्त वातावरणात ही परीक्षा द्यावी, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
 
राज्य मंडळाच्या वतीने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत घेण्यात येत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दहावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत ३२ हजार १८९ ने वाढ झाली आहे. गेल्यावर्षी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यंदा खासगी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. राज्य मंडळाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिकराव बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. मार्च २०२४ च्या परीक्षेसाठी पेपरच्या नियोजित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. तसेच दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्यात येत आहेत.
 
नोंदणी केलेले विद्यार्थी
विद्यार्थी : ८,५९,४७८
विद्यार्थिनी : ७,४९,९११
तृतीयपंथी : ५६
एकूण : १६,०९,४४५

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती