दहावीच्या विद्यार्थ्यांचं 100 गुणांचं मूल्यमापन होणार - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

शुक्रवार, 28 मे 2021 (15:23 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्ष रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
 
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी 100 गुणांचं मूल्यमापन करण्यात येईल. नववी आणि दहावीचे शाळाअंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. त्यानंतर जून अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
 
दहावीचा निकाल 'असा' लावला जाईल
विद्यार्थ्यांचे 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन - 30 गुण
विद्यार्थ्यांचे 10 वीचे गृहपाठ/तोंडी परीक्षा/प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन - 20 गुण
विद्यार्थ्याचा 9 वीचा विषयनिहाय अंतिम निकाल - 50 गुण
ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल, त्यांना कोव्हिड-19 ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील दोन परीक्षांमध्ये परीक्षेची संधी देण्यात येईल.
 
विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून केली जाईल.
 
शाळास्तरावर गैरप्रकार किंवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग आणि दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
 
जूनच्या अखेरपर्यंत निकाल घोषित करण्याचं शिक्षण विभागाचं नियोजन आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सर्व शाळांनी वेळापत्रकाचं पालन करण्याचे आदेशही देण्यात आलेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती