या आठवड्यात महाराष्ट्रातील मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आणि 14,000 हून अधिक शेतकरी बाधित झाले. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की 25 एप्रिलपासून मराठवाड्यात पाऊस आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल महसूल विभागाने शुक्रवारी प्रसिद्ध केला.
लातूरमध्ये 44.3 मिमी, नांदेडमध्ये 28 मिमी, हिंगोलीमध्ये 14.3 मिमी, उस्मानाबादमध्ये 13.9 मिमी, बीडमध्ये 12.7 मिमी, जालनामध्ये 7.8 मिमी, परभणीमध्ये 4.9 मिमी आणि औरंगाबादमध्ये 1.8 मिमी पाऊस झाला आहे.
मराठवाड्यात जालना, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांचा समावेश होतो. या अहवालानुसार, अवकाळी आणि संततधार पावसाने बाधित झालेल्या १५३ गावांपैकी १०१ जालना, ३८ हिंगोली आणि १४ उस्मानाबादमध्ये आहेत. अहवालाचा हवाला देत अधिकाऱ्याने सांगितले की, नांदेडमध्ये अवकाळी पावसाच्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.
या अहवालानुसार नांदेडमध्ये सहा, लातूरमध्ये दोन आणि बीड आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी एकाचा अवकाळी पावसाशी संबंधित घटनांमुळे मृत्यू झाला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “गेल्या 72 तासांत अवकाळी पाऊस आणि वादळामुळे एकूण 1,178 कोंबड्या आणि 147 पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे 8058.66 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून, 14,441 शेतकरी बाधित झाले आहेत.