साहित्यिकांसाठी ‘प्रतिभा संगम’ नाशकात

बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (10:07 IST)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने १४ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील विद्यार्थी साहित्यिकांसाठी प्रतिभा संगम या राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलनाची सुरुवात केली आहे. प्रतिभा संगम मुळे योग्य वयात विद्यार्थ्यांच्या साहित्य जाणिवा समृद्ध होतात, दर्जेदार लेखनासाठी प्रोत्साहन मिळते. प्रतिभावान विद्यार्थी साहित्यिकांना प्रस्थापित साहित्यिकांबरोबर मुक्तसंवाद साधता येतो. विद्यार्थ्यांच्या साहित्यावर मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीने खुली चर्चा होऊन मार्गदर्शन मिळते. अशा या अभिनव साहित्य संमेलनाचे १५वे पुष्प नाशिक येथे दि. २३,२४,२५ सप्टेंबर या दिवसांत गुंफले जाणार आहे. रावसाहेब थोरात सभागृहात होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कादंबरीकार श्री. विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर संमेलनाच्या समारोपास प्रमुख अतिथी अभिनेत्री पल्लवी जोशी उपस्थित राहणार आहेत. ३ दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यातील सुमारे ५०० विद्यार्थी साहित्यिक आणि अनेक नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती निमंत्रक प्रा. डॉ. गिरीश पवार आणि स्वागत सचिव श्री.दिनेश रणदिवे यांनी दिली.
 
नाशिक मध्ये प्रतिभा संगम पहिल्यांदाच होत असून या साठी निर्माण करण्यात आलेल्या स्वागत समितीचे कार्याध्यक्ष प्रथितयश उद्योजक श्री.महेश दाबक आहेत तर श्री. दिनेश रणदिवे हे स्वागत समितीचे सचिव आहेत. या पूर्वी अंमळनेर, रत्नागिरी, पुणे, ठाणे, गोवा, जळगाव, परभणी अशा विविध ठिकाणी १४ संमेलने संपन्न झाली आहेत.
 
या ‘प्रतिभा संगम’मध्ये राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी-साहित्यिकांना खुले निमंत्रण देण्यात आले आहे. एका महाविद्यालयातील कितीही विद्यार्थी संमेलनात सहभागी होऊ शकतात. कविता, कथा, वैचारिक लेख, पथनाट्य, ललितलेख, लघुपट या साहित्य प्रकारांचा समावेश प्रतिभा संगम मध्ये आहे.
 
प्रतिभा संगम साहित्य संमेलन स्थळास महाकवी वामनदादा कर्डक नगर असे नाव देण्यात येणार आहे. संमेलनाच्या व्यासपीठास निसर्गकवी नरेश पाटील यांचे नाव देऊन श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. तर प्रदर्शनी कक्षास स्व. मुरलीधर खैरनार यांचे नाव देण्यात येणार आहे.
 
 दि. २३ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून संमेलनस्थाना-पर्यंत साहित्यदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर जाहीर उदघाटन समारोह, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दि २४ सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन वाडःमय मंडळ प्रमुखांचे, प्राध्यापकांचे एकत्रीकरण व चर्चा, श्री. अशोक बागवे या प्रसिद्ध साहित्यिकाची प्रकट मुलाखत झाल्यानंतर; कविता/कथा/वैचारिक लेख/पथनाट्य लेखन/अनुदिनी लेखन (Blogs)/लघुपट या विषयात लेखन करणारया विद्यार्थ्यांची गटशः चर्चा-सादरीकरण व मार्गदर्शन होणार आहे.
 
दि.२५ सप्टेंबर रोजी निवडक प्रतिनिधींची परिचर्चा, हिंदी भाषेतून प्राचार्य डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांचे व्याख्यान, श्री, नंदेश उमप यांचे आविष्कार या विषयावर सप्रयोग व्याख्यान आणि समारोप व पारितोषिक वितरण होणार आहे.
 
यासाठी राज्यातील साडेतीन हजार महाविद्यालयात प्रवेश अर्ज पाठविण्यात आले असून प्रतिभा संगमच्या संकेतस्थळावर हे उपलब्ध आहेत. प्रवेश पत्र न पाठविलेले विद्यार्थी सुद्धा संमेलनात सहभाग घेऊ शकतात. यासाठी विद्यापीठ विभाग निहाय विद्यार्थ्यांची संपर्क रचना तयार करण्यात आली आहे. त्यात मकरंद कुलकर्णी (मुंबई)-९२२०४४५४९८, मयुरेश्वर कुळकर्णी (विदर्भ)-९७६६७२०३५६ यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी ८६९८३८९९१५ या भ्रमणध्वनीवर अथवा [email protected] वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा