सप्तश्रृंगी गडावर नवरात्राची तयारी अंतिम टप्प्यात

शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016 (16:07 IST)
देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या  वणी येथील सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाची अंतिम टप्प्यात आली आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रष्टच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. यात प्रामुख्याने मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात येत असून, पहिल्या पायरीवर मंडपाची कमान टाकली  आहे.  यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने गडावर येणार्‍या भाविकांच्या गर्दीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन गडावरील प्रसादालयाच्या दुकानदारांनी घाऊक प्रमाणात माल भरला आहे. 
 
यात्रा काळात सुमारे १० ते १२ लाख भाविक गडावर येण्याची शक्यता आहे.  भाविकांसाठी ठिकठिकाणी पाणपोई ठेवण्यात येणार आहे, तसेच स्थानिक ग्रामपंचायत दिवसातून २ ते ३ वेळेस पाणीपुरवठा करणार आहे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने कळवणचे उपविभागीय पोलीस अधीक्षक देवीदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, तसेच गृहरक्षक दलाच्या वतीने नांदुरी गावापासून चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल, तसेच ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले आहेत. आरोग्य सेवेसाठी औषध साठय़ासह रुग्णवाहिका व निवासी वैद्यकीय पथक २४ तास कार्यरत ठेवण्यात येणार आहे. नवरात्रोत्सव कालावधीत राज्य परिवहन विभागाच्या बसेस वगळता खासगी वाहनांना गडावर प्रवेश नसून, त्यासाठी नांदुरी गावात भव्य वाहनतळाची व्यवस्था केली आहे. तसेच यात्रा काळात विविध शासकीय खाते, विश्‍वस्त मंडळ, ग्रामपंचायत यांच्यात समन्वय राखण्यासाठी नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा