मालाडमधील मंगेश शाळेत अंध कलाकारांचा संगीताविष्कार

शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 (11:12 IST)
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी कलादालन 2016 कलामहोत्सवाचे आयोजन केले होते. कलादालनच्या प्रवेशद्वाराजवळ माजी विद्यार्थिनी निशा उपळे ह्यांनी काढलेली संस्कारभारती रांगोळी आणि समोर बासरी-तबला वादनाने रंगलेला कलारसिकांसाठी सुश्राव्य स्वरधार कार्यक्रम असा कलादालनाचा थाट होता. 'स्वराधार' च्या सांस्कृतिक मैफलीने.कलादालन महोत्सवाला रंगत आली होती. हेमलता तिवारी संचलित ‘स्वराधार’ या संस्थेतल्या अंध कलाकारांनी प्रस्तुत केलेला वाद्यवृंद हा विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला. शालेय विद्यार्थी व शिक्षकांच्या फर्माइशीवर कलाकारांनी देशभक्ती गाण्यापासून ते नव्या चित्रपट संगीतापर्यंतची म्युझिकल ट्रीट सादर केली. शालेय विद्यार्थ्यांनी 'झिंगाट' च्या ठेकावर मनमुराद नाचण्याचा आनंदही लुटला. रेल्वे डब्यात आणि रेल्वे आवारात गाणी गाऊन, वाद्य वाजवून पोटाची खळगी भरणा-यांना समाजात ‘कलाकाराचा’ दर्जा आणि ‘व्यासपीठ’ मिळवून देणा-या स्वराधार संस्थेचे सर्वांनीच कौतुक केले. 
 
ह्या महोत्सवात 6 ते 13 ऑगस्ट स्पर्धा आणि 15 ते 16 ऑगस्ट प्रदर्शन ठेवण्यात आले होते. कलादालन प्रदर्शनाचे उदघाटन मंगेश विश्वस्त मंडळाचे श्री. विंझणेकर, श्री. परळकर आणि श्री. गुप्ता ह्यांनी केले. माध्यमिक विभागाने घेतलेल्या विविध स्पर्धा कलाकृतीही प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. कलादालन कला महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, रुबिक्स क्यूब, अभ्यास प्रकल्प, मातीकाम, स्मरणशक्ती, एकपात्री अभिनय स्पर्धा तर माजी विद्यार्थ्यांसाठी कलात्मक चित्रकला, कलात्मक कलाकुसर, वाद विवाद स्पर्धा आणि फोटोग्राफी ह्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना चित्रकला आणि अभ्यास प्रकल्प ह्या स्पर्धांसाठी सहभागाची संधी देण्यात आली होती. त्यात अनेक माजी विदयार्थ्यांच्या पाल्यांनी सहभाग नोंदविला. कलाप्रदर्शनात स्पर्धेत सरस ठरलेल्या निवडक कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. कलादालन कला महोत्सवाला ह्या चौथ्या वर्षीही भरभरून प्रतिसाद मिळाला. परिसरातीलच नव्हे तर इतर शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा कलादालन प्रदर्शनाचा आस्वाद घेतला. महोत्सवाच्या निमित्ताने 1980 ते 2016 वर्षीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला. शाळेतील गरीब-गरजु विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आव्हान शिक्षकवृंदांनी केले.
 
मंगेश शाळेतर्फे सामाजिक जनजागृती करणा-या प्रभात फेरीचे आयोजन केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृतीचे संदेश देण्यासाठी गाणी, चित्रकलाकृती, काव्यमय घोषणा आणि फलकाचा वापर केला होता. मतदान जनजागृती आणि स्वच्छता अभियानाच्या संदेशातून त्यांनी कृती उपक्रमांना हि भर दिला होता. कलादालन महोत्सव 2016 चा स्पर्धा निकाल लवकरच माजी विद्यार्थी संघाच्या www.mvmmvs.org ह्या वेब साईट वर जाहीर करण्यात येईल. जुन्या शालेय मित्रमैत्रिणींची भेट करून देणारा आणि नवनव्या कला-कल्पनेला वाव देणारा 'कलादालन कला महोत्सव' पुढच्या वर्षीही असाच अनोखा असेल अशी माहिती माजी विद्यार्थी संघाने दिली.

वेबदुनिया वर वाचा