ज्यांनी महाड पुलाचं स्ट्रक्चरल ऑडीट केलं त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी याचिका सामाजिक कार्यकर्ते प्रणय सावंत यांनी केली आहे. दुर्घटनेसंदर्भात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अंधारात सावित्री नदीच्या पोटात गडप झालेल्यांचा शोध अद्याप सुरु आहे.
पावासामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. पण तरीही शोध पथक आपलं काम नेटाने करत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 27 मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. एकूण 42 जण बेपत्ता झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे बेपत्ता लोकांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. शोधकार्य करण्यासाठी लागलेला सर्व खर्च जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा, असंही सावंत यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे.