आयपीएल महाराष्ट्राबाहेरच

नवी दिल्ली- आयपीएलचे 1 मे नंतरचे सामने आता महाराष्ट्राबाहेरच होतील. भीषण दुष्काळामुळे राज्यात होणारे आयपीएलचे सामने इतर ठिकाणी खेळवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
 
राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, आयपीएलचे महाराष्ट्रात होणारे 13 सामने इतर राज्यात खेळवण्यात यावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर बीसीसीआयने विनंती केल्याने 1 मे रोजी पुण्यात होणारा सामना खेळवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. तसेच आयपीएलच्या वेळापत्रकानुसार, सामने खेळवण्यात यावेत, अशी विनंती केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. महाराष्ट्रात पाणीटंचाई असताना आयपीएलचे सामने नको. भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे सामने महाराष्ट्राबाहेरच खेळवणे योग्य आहे, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा