टाटात पुन्हा 'ब्लॉक क्लोजर'

वार्ता

रविवार, 23 नोव्हेंबर 2008 (19:35 IST)
देशातील मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने पुन्हा एकदा आपला कारखाना पाच दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

एका महिन्यात टाटांनी आपल्या प्रकल्पात दुसऱ्यांदा 'ब्लॉक क्लोजर' जाहीर केल्याने उद्योग जगतात चिंता निर्माण झाली आहे. टाटांनी पाच दिवस कारखाने बंद करण्याची घोषणा केली असली तरी सहा दिवस प्रकल्प बंद राहणार आहेत.

25 ते 29 नोव्हेंबर या काळात जमशेदपूर कारखाना बंद राहणार असून, तीस तारखेला रविवार असल्याने या दिवशीही कारखाना बंदच राहणार असल्याचे टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

जागतिक आर्थिक मंदीचा फटका सध्या देशातील उद्योगांना भेडसावत असून, मंदीमुळे सलग दुसऱ्यांदा टाटांनी काम बंद केल्याने आर्थिक मंदी आपले पाय भारतातही पसरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यापूर्वी टाटांनी सहा ते आठ नोव्हेंबर या दरम्यान तीन दिवसांसाठी काम बंद करण्याची घोषणा केली होती.

वेबदुनिया वर वाचा