'गदिमां'चे गीत रामायण

मराठी घराघरात आणि मनामनात सुधीर विनायक फडके हे नाव अजरामर आहे. गीत रामायणातील गोडव्यापासून ते भावविभोर करून सोडणा-या गीतांतून मराठी मनामनावर बाबुजींनी राज्य केले आहे. मराठी-हिंदी गीतांचे गायक व संगीतकार म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे. सलग पाच दशकांहून अधिककाळ त्यांच्या गीत आणि संगीताने कानसेनांना तृप्त केले आहे. 
 
महाराष्ट्राच्या घराघरात बाबूजी जाऊन पोचले ते 'गदिमां'च्या गीत रामायणामुळे. या रामायणातील 56 गीतांसाठी त्यांनी दिलेले संगीत आणि केलेले गायन एक वेगळाच प्रयोग आहे. त्यांनी गीत-रामायणाचे देश-विदेशात 1800 कार्यक्रम केले. आकाशवाणीवर सर्वाधिक लोकप्रियता मिळविलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम ठरला आहे. 
 
रामकथेची अनेक वैविध्यमय पद्य व गद्यरूपे भारतीयांच्या मनावर राज्य करीत राहिली. अनेक ऋषितुल्य कवींनी आपल्या काव्यातून त्या धनुर्धर योद्धय़ाचे चरित्र वर्णिले. मराठीतही पंतकवींची अनेक रामायणे आहेत. कीर्तन, प्रवचनातून त्यातील पंक्ती गायल्या जातात. पण या सर्व रचना विज्ञानुगाचा आरंभ होण्यापूर्वीच आहेत. अलीकडील काळात रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारी एक अजोड रामकथा म्हणजे 56 गीतमौक्तिके असलेले ‘गीत रामायण’. 1955 च्या 1 एप्रिलला रामनवमीदिवशी आकाशवाणीच पुणे स्थानकावरून-
 
‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती। कुशलव रामायण गाती।।’
 
हे पहिले स्वरपुष्प उमलले व कालांतराने या 56 पुष्पांचा सुगंध आकाशमार्गे सर्वदूर पसरला. विज्ञान व श्रद्धा यांच समन्वयाने घडलेल्या या संमोहनाचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. गदिमा आणि सुधीर फडके यांच्या प्रतिभेच्या बहरकाळातला मोहर म्हणजे ‘गीत रामायण’. दोहोंच्याही सर्जनशीलतेच्या चरमसीमेची मोहर या गीतांवर उमटली आहे. भारतीयांच्या भावगुंफेत शतकानुशतके विराजमान असलेल्या ‘श्रीराम’ या दैवी व्यक्तिरेखेस गदिमांनी भावपूर्ण शब्दात गुंफले व ‘पंत संत तंत’ वाङ्मयाचे सकळ सार या गीतात मांडले. तरीही ते तुकोबारांसारखे ‘वदवी गोविंद तेचि वदे’ अशा नम्रतेने या अलौकिक ‘अमृतसंचया’चे मातृत्व स्वीकारतात.
 
जगातील कुणीही रामकथा वाचली तर त्याला ती आपलीशी वाटेल. अर्थात हेच कुठल्याही महाकाव्याचे वैशिष्टय़ असते. गदिमांनी हेच वैशिष्टय़ ओळखून या महाकाव्याला साधे सोपे बनवले व सामान्यांच्या जीवनाशी त्याचे नाते जोडले. हीच ‘गीतरामायणा’ची अद्भुतता! गदिमांची लेखणी शतकांचे अंतर कापते व आपल्या चरित्रनायकाचा वा नायिकेच्या मा चा अचूक वेध घेते. ‘लीनते, चारुते, सीते’ वा ‘मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे’ ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. दशरथाच्या  देहप्रयाणाची वार्ता ऐकल्यानंतर ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हा भरताला केलेला उपदेश केवळ तत्त्वज्ञान राहात नाही. धीरोदात्तपणे दु:ख सहन करूनही दुर्बल न बनता कर्तव्य व कर्तृत्व ह्यांची सांगड घालून रामायण कसे घडवावे, याचा सामान्य जीवांना दिलेला तो राममंत्रच बनतो. 
 
कर्तव्याच्या कठोर हाकेला साद देऊन सत्तेची संगत व नात्यांची निकटता निग्रहाने नाकारून वनवासाची वाटचाल पुढे सुरू ठेवणारा राम एका महाकावचा विषय न बनला तरच नवल! हा महानायक व त्याला शब्दांकित करणारा महाकवी या दोहोंनाही आजच्या श्रीरामनवमीनिमित्ताने प्रणाम! महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांनी टिळकांच्या गायकवाड वाडय़ातील समारंभात गदिमांना ‘आधुनिक वाल्मीकी’ ही पदवी बहाल केली. साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकर गदिमांना म्हणाले, ‘आजच्या पिढीत तुमच्या योग्यतेचा दुसरा कवी नाही.’ विजादशमीच्या निमित्ताने दिल्या  जाणार्‍या सोन्याच्या द्विपत्राप्रमाणे ‘गीतरामायणा’ची गदिमा व बाबूजी ही दोन सुवर्णपाने आहेत.

वेबदुनिया वर वाचा