रक्षाबंधन : हिंदू संस्कृतीतील नातेसंबंध

शनिवार, 9 ऑगस्ट 2014 (13:20 IST)
* संस्कृतीतील नात्यांचे बंधन आपल्याला आदर्श जीवन जगण्याचा पाठ शिकवत असणे : आपल्या संस्कृतीत अनेक नाती आहेत. नात्यांमुळेच आज आपण सर्व जण माळेतील मण्यांप्रमाणे प्रेमाच्या नात्यांनी बांधलो गेलो आहोत. नात्यांच्या बंधनांमुळेच प्रत्येक कुटुंब आनंदी आणि सुखी आहे.
 
* पाश्चात्यांच्या विकृत अनुकरणाने नाती दुरावण्याचे भय निर्माण होणे : आपल्या संस्कृतीत कुणी कुणाची आई आहे, तर कुणी कुणाचा भाऊ किंवा बहीण आहे. आपल्याकडे पती, पत्नी, मामा, काका, काकी, मावशी अशी अनेक नाती आहेत. ही नाती नसती, तर आपण आदर्श जीवन जगू शकलो असतो का? ही नातीच आम्हाला आदर्श जीवन जगण्याचा पाठ शिकवतात; परंतु पाश्चात्यांच्या अनुकरणाच्या विकृतीने ही सर्व नाती दुरावतील की काय, याचीच चिंता वाटते. आजकाल आपण पाहतो की, कुणाला कुणाविषयी प्रेम आणि आपुलकीच उरली नाही.
 
* नाती जपणे आणि ती टिकवणे, म्हणजे संस्कृतीचे रक्षण करणे : आपल्या भावाला चांगले गुण मिळाल्यावर आपण ते सर्वाना आनंदाने सांगतो ना. आपल्या बाबांनी आपल्याला नवीन वस्तू आणल्यावर आपण ती सर्वाना दाखवतो. यातून आपल्याला लक्षात येईल की, नात्यांमुळे आपल्या जीवनातील छोटय़ा छोटय़ा गोष्टीतील आनंद आपल्याला घेता येतो. 
आपण तसे करूया ना !
 
* संस्कृतीतील रक्षाबंधन सणामुळे बहीण-भावाच्या नात्याचे संवर्धन होणे : मित्रांनो, रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या नात्याचे संवर्धन करतो. बहीण आणि भाऊ यांच्यातील नात्यालासुद्धा फार महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. यातून त्यांच्यामधील प्रेम   वृद्धिंगत होते. राखी बांधणार्‍या बहिणीचे रक्षण करण्याचे दायित्व भावाचे असते.
 
* रक्षाबंधनाने या नात्याचे पवित्र बंधनात रूपांतर होणे : जेव्हा एखादी मुलगी अथवा स्त्री एखाद्या मुलाला किंवा पुरुषाला राखी बांधते, त्या क्षणाला ती त्याची बहीण होते. आपले सण किती महान आहेत ना ! एका रक्षाबंधनाने नात्याचे पवित्र बंधनात रूपांतर होते.
 
* आपल्या सणांचे महत्त्व न जाणल्याचे दुष्परिणाम : आज आपले दुर्दैव असे की, ज्या दिवसांना महत्त्व नाही, ते आपण आंधळ्यासारखे साजरे करत आहोत. आजच्या मुलांना रक्षाबंधनाचे महत्त्व ठाऊक नसल्याने ते पाश्चात्यांचे फ्रेंडशिप डे, रोज डे, व्हॅलेंटाईन डे असले निरर्थक आणि अर्थहीन डे (दिवस) साजरे करतात. मला सांगा, या डे साजरे करण्यातून कोणती पवित्र नाती समाजात निर्माण होतात? समाजाला रक्षाबंधन म्हणजे दिवसेंदिवस स्त्रियांवर वाढणारे अत्याचार रोखण्याचा निश्चय करण्याचा दिवस ! : आपण प्रत्येक दिवशी स्त्रियांवरील अत्याचारांच्या बातम्या वाचतो. समाजातील ही विकृती आपल्याला नष्ट करायची असेल, तर प्रत्येक पुरुषाने या राष्ट्रातील प्रत्येक स्त्री माझी बहीण आहे आणि तिचे रक्षण करणे, हे माझे परम कर्तव्य आहे, असा निश्चय केला पाहिजे. त्यामुळे यापुढे समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार नक्कीच थांबतील. हेच खरे रक्षाबंधन ठरेल !
 
- राजेंद्र पावसकर

वेबदुनिया वर वाचा