भाजपचा तिसरा उमेदवार शंभर टक्के जिंकणार, - चंद्रकांत पाटील

शुक्रवार, 3 जून 2022 (21:39 IST)
राज्यसभेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकांच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली असून निवडणूक बिनविरोध करण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. भाजप सहाव्या जागेसाठी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. यामुळे शिवसेना विरुध्द भाजप  असा थेट सामना रंगणार आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी आणि आमच्यात तासभर चर्चा झाली. तिसरी जागा मागे घ्या, असे ते म्हणत होते. त्याबदल्यात विधान परिषदेची एक जागा जास्त देण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीचा होता. त्यावर तुम्ही राज्यसभेसाठीची दुसरी जागा मागे घ्या आणि आम्ही विधानपरिषदेची पाचवी जागा लढवणार नाही, असा प्रस्ताव आम्ही दिला. त्यानंतर आमचा कोणताही संवाद झाला नाही, असे त्यांनी सांगितले.
 
पुरेसे संख्याबळ त्यांच्याकडेही नाहीत आणि आमच्याकडेही नाहीत. पण, आमच्याकडे विजयासाठी लागणारी 12 मते आहेत. इतर पक्षाच्या उमेदवाराशी आमचा संपर्क नाही. पण, ब्रँडेड मते आम्हाला पडतील, असा सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपचा तिसरा उमेदवार 100 टक्के जिंकणार असल्याचा विश्वासही पाटलांनी व्यक्ता केला.
 
तर, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावर आपली मते सुरक्षित करण्यासाठी महाविकास आघाडीकडून आमदारांना सुरक्षित हॉटेलवर ठेवण्याची चर्चा आहे. तर, आमचा माणसाच्या सद्सदविवेक बुद्धीवर विश्वास आहे त्यामुळे आम्ही कोणत्याही आमदारांना हॉटेलवर ठेवणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

संख्याबळाबाबतीत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आमच्याकडं पहिल्या पसंतीची 30 मतं आहेत. दुसऱ्या पसंतीच्या जोरावर धनंजय महाडिकांना विजय मिळवून देऊ, असे त्यांनी म्हंटले आहे. घोडेबाजार करणार नाही, असेही पाटलांनी स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती