असा झाला हेलिकॉप्टरला अपघात

गुरूवार, 3 सप्टेंबर 2009 (18:20 IST)
WD
WD
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा मृत्यू नेमका कसा झाला याविषयीचे गूढ आता उकलले आहे. रेड्डी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर मार्ग भरकटून नल्लामलाई जंगलात एका डोंगरकड्याला जाऊन धडकले आणि त्यानंतर कोसळले, अशी माहिती आता पुढे आली आहे.

वित्तमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्री के. रोशय्या आणि मुख्य सचिव पी. रमाकांत रेड्डी यांनी ही माहिती दिली. हे हेलिकॉप्टर ढगांमुळे नियोजित मार्गापासून भरकटले. कुर्नूल जिल्ह्यातील नल्लामलाई जंगलभागात पूर्वेला १८ किलोमीटरपर्यंत गेले. तिथे एका डोंगराच्या कड्याला धडकले आणि तिथे स्फोट होऊन जळाले. त्या स्फोटातच आतील पाचही जणांचा मृत्यू झाला असे या दोघांनी सांगितले.

बेल ४३० जातीच्या या हेलिकॉप्टरची शेपटी तेवढी वाचली. बाकी पूर्ण हेलिकॉप्टरच्या ठिकर्‍या उडाल्या. रूद्रकोद्रू नावाच्या पर्वतीय भागापासून दहा किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळले. हा भाग इतका दुर्गम होता की सैन्याच्या जवानांनाही दोराच्या सहाय्याने या ठिकाणी जावे लागले.

सुरवातीला केवळ तीनच मृतदेह सापडले. त्यानंतर चौथा सापडला. पाचवा मृतदेह सापडायला थोडा वेळ लागला. त्यांच्या कपड्यांवरून हे मृतदेह ओळखता आले, असे पोलिस महासचंलाक एस. एस. पी. यादव यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा