लोकांवर 'ममता' दाखविणारा अर्थसंकल्प

शुक्रवार, 3 जुलै 2009 (17:37 IST)
रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी वर्षात रेल्वेच्या प्रवासी नि मालभाड्यात कोणतीही भाडेवाढ न सुचवता, लोकसभा निवडणुकीतील निकालाबद्दल 'जनतेचे आभार मानणारा' अर्थसंकल्प आज सादर केला. 'लालूच' दाखवून मोजकाच 'प्रसाद' हातात ठेवण्याच्या पूर्वसुरींच्या अर्थसंकल्पाचीच री ओढली. बारा नॉन स्टॉप लांबच्या अंतराच्या गाड्या आणि इंटरसिटी गाड्यांना डबलडेकर कोचेस लावण्याची योजना या अर्थसंकल्पातील लक्षवेधी बाबी ठरू शकतील.

त्याचवेळी युपीएचा हक्काचा मतदार असलेल्या आम आदमीकडे लक्ष देऊन ममता दिदींनी त्याच्यासाठी दीड हजार रूपये मासिक उत्पन्न असलेल्यांना २५ रूपयांत महिनाभर शंभर किलोमीटरपर्यंत फिरता येईल, याचीही तरतूद करून ठेवली. याशिवाय नव्या ५७ गाड्याही सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली असून २७ गाड्यांचे मार्ग वाढविण्यात आले असून तेरा गाड्यांच्या फेर्‍या वाढविल्या आहेत.

तत्काळ ही अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना अधिका प्रवासीभिमुख बनविताना, तिच्या आरक्षणाचा कालावधी पाचवरून दोन दिवसांवर आणला असून किमान शुल्क दीडशेवरून शंभरापर्यंत आणले आहे.

मुस्लिमांना खुश करण्यासाठी मदरशातील विद्यार्थ्यांनाही तिकीट सवलत योजना लागू करण्यात आली आहे. कोलकत्यातील विद्यार्थ्यांचे सवलतीतील पास आता रेल्वे आणि मेट्रो रेल्वेलाही चालतील.

आगामी वर्षांत मालवाहतुकीचे उद्दिष्ट ८८२ दशलक्ष टनांचे ठेवण्यात आले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ते ४९ दशलक्ष टनांनी जास्त आहे. तसेच प्रवाशांच्या संख्येतही सहा टक्के वाढ गृहित धरण्यात आली आहे. वाहतुकीतून एकूण उत्पन्न ८८ हजार ४१९ कोटी रूपये मिळतील आणि गतवर्षाच्या तुलनेत ८ हजार ५५७ कोटी रूपयांनी अधिक आहे. त्याचवेळी सर्वसाधारण खर्च ६२ हजार ९०० कोटीचा गृहित धरण्यात आला आहे. यात सहाव्या वेतन आयोगामुळे पडलेल्या भाराचीही तरतूद करण्यात आली आहे.

ममतादिदींनी पश्चिम बंगालच्या कचरापारा- हालिशपूर रेल्वे कॉम्प्लेक्समध्ये नवी कोच फॅक्टरी सुरू करण्याचे जाहीर केले. यात दरवर्षी पाचशे कोच तयार होतील. यात खासगी क्षेत्राचीही मदत घेतली जाईल.

मुंबईप्रमाणेच दिल्ली, चेन्नई व कोलकाता येथे 'लेडिज स्पेशल' ट्रेन सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. याशिवाय युवा आणि आर्थिक कमकुवत वर्गासाठी स्वस्तात प्रवास शक्य असलेल्या आणि वातानुकुलित व्यवस्था असलेल्या 'युवा' ट्रेन सुरू करण्याचेही त्यांनी घोषित केले. ग्रामीण भागातून या गाड्या शहराकडे येतील. त्यांचे दीड हजार किलोमीटरपर्यंतचे भाडे २९९ तर अडीच हजार किलोमीटरपर्यंतचे भाडे ३९९ रूपयांपर्यंत असेल. मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-कोलकता या दरम्यान आगामी तीन महिन्यात चाचणी म्हणून या गाड्या सुरू केल्या जातील.

असंघटित क्षेत्रातील वर्गाला सवलतींचा मासिक पास 'इज्जत' या योजनेखाली दिला जाईल. याशिवाय बारा नॉन स्टॉप ट्रेन्सना 'तुरंत' असे नाव देण्यात आले आहे.

रेल्वेवर सामाजिक दायित्वाचेही भान आहे, हे सांगून आर्थिकदृष्टया न परवडणारे परंतु, सामाजिकदृष्ट्या आवश्यक अशा प्रकल्पांचा आढावा घेऊन मागास विभागांना अधिक फायदा कसा देता येईल, हे पाहण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. असा प्रकल्पांना वित्तपुरवठा कसा होईल नि त्याची अंमलबजावणी कशी होईल, यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

रेल्वेतील स्वच्छतेत सुधारणा, गुणवत्ता, सुरक्षितता आणि तत्परता या गोष्टींकडेही लक्ष देण्यात येणार आहे. रेल्वेत दिल्या जाणार्‍या जनता खानाची गुणवत्ता तपासण्यावर भर दिला जाईल, तसेच त्यात राष्ट्रीय व स्थानिक पदार्थांचा समावेश असावा याकडे लक्ष दिले जाईल.

पर्यटन, तीर्थयात्रा आणि औद्योगिक ठिकाणे असलेल्या ५० ठिकाणी मल्टिफंक्शनल कॉम्प्लेक्स उभारण्यात येतील. यात शॉपिंग, फूड स्टॉल व स्वस्तातली हॉटेल्स असतील. गाड्यांमध्येच 'हाऊस किपिंग'ची व्यवस्थाही आता आणखी दोनशे गाड्यांमध्येही देण्यात येईल. यात आधुनिक लॉंड्रीसह विविध व्यवस्था असतील. याशिवाय लांबच्या अंतराच्या गाड्यांमध्ये डॉक्टरही असतील. याशिवाय सात शहरांत रूग्णवाहिका सेवाही सुरू करण्यात येईल.

पत्रकारांना खुश करताना त्यांना प्रवास भाड्यात सवलतीची टक्केवारी ३० वरून ५० पर्यंत नेली आहे. पत्रकारांच्या बायकांनाही वर्षातून एकदा प्रवासावर ५० टक्के सवलत मिळेल. याशिवाय पत्रकारांना सध्याच्या कूपन प्रणालीतून मुक्त करून फोटो आयडेंटिटी कार्ड व क्रेडिट कार्ड देण्यात येईल.

देशातील पन्नास विशेष रेल्वे स्थानकांना जागतिक दर्जाचे बनविण्यासाठी विकसित करण्यात येईल. याशिवाय ३७५ स्टेशन्स आदर्श म्हणून विकसित करण्यात येतील.

देशभरातील ५०० पोस्ट ऑफिसातून संगणकीकृत तिकीट विकण्यात येण्याची घोषणाही त्यांनी केली. याशिवाय मोबाईल व्हॅनमधून 'मुश्किल आसान' या योजनेखाली तिकीट विक्री करण्यात येईल. देशभरात अशा ५० व्हॅन्स तिकीट विकतील.

त्यांनी पार्सल सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या चालविण्याचीही घोषणा केली. त्यामुळे पार्सल्स वेळेत पोहोचतील. त्याचे बुकिंग इंटरनेटवर होईल, असेही त्यांनी सांगितले.

फळ आणि भाज्यांची वेळेत वाहतूक होत नसल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी रेल्वे विशेष गाड्या चालविणार आहे. फळ व भाज्या खराब होऊन दरवर्षी ३५ ते ४० कोटींचे नुकसान होते. म्हणूनच या नाशवंत वस्तूंना उत्पादनस्थळापासून ते ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष गाड्या चालविण्यात येतील, अशी घोषणा रेल्वेमंत्री ममता बॅनर्जींनी आज केली. त्यामुळे या भाज्या नाश पावणार नाहीत, असे त्या म्हणाल्या. याशिवाय खासगी व सार्वजनिक उद्योगांच्या एकत्रीकरणातून शीतगृह उभारण्याची योजनाही त्यांनी जाहीर केली. यासंदर्भात खासगी क्षेत्राची मदत घेतली जाणार आहे.



वेबदुनिया वर वाचा