निवडणुकीच्या तोंडावर लालूंचा 'प्रसाद'

निवडणुकीच्‍या तोंडावर रेल्‍वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी आज मतदारांना फिल गुडची अनुभूती देण्‍यासाठी रेल्‍वेचा सहावा हंगामी अर्थसंकल्‍प सादर केला. कोणतीही दरवाढ न केलेल्या अर्थसंकल्पात सामान्यांपेक्षा निवडणुकीचा विचार केलेला स्पष्टपणे जाणवतो. लालूंनी या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला एकही नवी रेल्वेगाडी दिलेली नाही. महाराष्ट्रापेक्षा बिहारवर सुविधांची बरसात केली आहे.

समाजातील प्रत्येक घटकावर मेहरनजर ठेवत लालुंनी बजेटमध्‍ये रेल्‍वे प्रवास भाड्यातही कपात केली आहे. नवीन दरानुसार पन्‍नास रुपयांपेक्षा कमी प्रवास भाडे असलेल्‍या टिकीटासाठी एक रुपयाची कपात केली आहे. तर त्‍यापेक्षा अधिक भाड्यात दोन टक्‍क्‍यांची कपात करण्‍यात आली आहे.

मालभाड्यात वाढ नाही
यंदा मालभाडे कमी केले जाण्‍याची शक्‍यता वर्तविली जात असतानाच लालूप्रसाद यादव यांनी मालभाड्यात कोणतीही वाढ किंवा घट न करण्‍याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय अधिक माल वाहतुकीसाठी डबल कंटेनर ट्रेन चालविली जाणार असून त्‍यासाठी दरवर्षी 15 हजार कंटेनर बनविले जाणार आहेत. तर 43 नवीन रेल्‍वे सुरू करण्‍याचाही निर्णय जाहीर केला आहे.

उत्तर भारतातून मुंबईकडे जाण्यासाठी नवीन ट्रेन
उत्तर भारतातून मुंबईत जाणा-यांची खास काळजी लालूने घेतली आहे. वाराणसी ते मुंबई आणि गोरखपूर-मुंबई दरम्‍यान रोज एक नवीन रेल्‍वे सुरू करण्‍यात आली आहे. याशिवाय आग्रा-लखनौ, आग्रा-अजमेर, वाराणसी-जम्मू तवी आणि रांची-पटना जनशताब्दी ट्रेन चालविल्‍या जाणार आहेत. हावडा ते हरिद्वारसाठी आठवड्यातून पाच दिवस रेल्‍वे असणार आहे.

महाराष्ट्राला ठेंगा
लालूंनी नव्या ४३ रेल्वेगाड्या सुरू केल्या असल्या तरी त्यात फक्त महाराष्ट्रासाठी म्हणून एकही रेल्वेगाडी नाही. कोल्हापूरहून धनबादपर्यंतची एक नवी गाडी सोडली तर बाकीच्या गाड्यांचा उपयोग प्रामुख्याने उत्तर प्रदेशी आणि बिहारींसाठी होणार आहे.

आता येणार बुलेट ट्रे
देशात बुलेट ट्रेन सुरू करण्‍याचा इरादा स्‍पष्‍ट करतानाच लालुंनी दिल्ली-पाटणा, दिल्ली-अमृतसर, अहमदाबाद-पुणे, हैदराबाद-विजयवाड़ा-चेन्नई, चेन्नई-बंगळूरू, कोलकाता-हल्दिया आणि एर्नाकुलम-हावड़ा याच्‍या दरम्‍यान बुलेट ट्रेन सुरू करण्‍याचा विचार असल्‍याचे म्‍हटले आहे. याशिवाय सात मार्गांवर बुलेट ट्रेन चालविण्‍यासंदर्भात संशोधन केले जात आहे. लुधियाना-कोलकाता फ्रेट कॉरिडोरवर या महिना अखेरीपर्यंत काम केले जाणार आहे. ठाणे आणि भागलपूरमध्‍ये रेल्‍वेचा नवा विभाग स्‍थापित केला जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा