अण्णासाहेब मगर स्कूल,ड क्षेत्रीय कार्यालयांत ‘किऑस्क’द्वारे मिळणार लसीकरणाचे टोकन

मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (08:14 IST)
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे टोकन मिळविताना नागरिकांना अडचण येत असल्याने नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या प्रयत्नातून पिंपळेसौदागर येथे अण्णासाहेब मगर स्कूल आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांत लसीकरणाचे टोकन मंगळवारपासून ‘किऑस्क’द्वारे देण्यात येणार आहे. या दोनही ठिकाणी किऑस्क मशिन बसविण्यात आली आहे.
 
केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगातून महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांचे मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने लसीकरण केले जाते. केंद्रावर दिल्या जाणाऱ्या टोकन पद्धतीबाबत नागरिकांचा रोष दिसून येत आहे. नागरिकांमध्ये वारंवार वाद विवादाचे प्रसंग उद्भभवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘किऑस्क’द्वारे (KIOSK) मार्फत नागरिकांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या संकल्पनेनुसार मंगळवार पासून पालिकेच्या अण्णासाहेब मगर स्कूल व ड क्षेत्रिय कार्यालयांमधून टोकन देण्यात येणार आहे. मोबाईल क्रमांक, जन्म वर्ष, प्रथम अथवा द्वितीय लस इत्यादीची नोंद करून नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर उपलब्ध होणारा OTP, KIOSK मध्ये नोंदवून नागरिक आपली माहिती समाविष्ठ करू शकतात.
 
नोंद झाल्यानंतर नागरिकांस ‘किऑस्क’मधून छापिल टोकन क्रमांक प्राप्त होईल. तसेच टोकन क्रमांक SMS द्वारे नागरिकांस पाठविण्यात येईल. या पद्धतीने नागरिकांची लसीकरणासाठी नोंद झालेनंतर शासनामार्फत उपलब्ध होणाऱ्या दररोजच्या डोस संख्येनुसार केंद्रीय पद्धतीने नागरिकांची निवड करून संगणक प्रणालीद्वारे SMS पाठवून नागरिकांनी निवड केलेल्या लसीकरण केंद्रामध्ये बोलावण्यात येईल.
 
‘किऑस्क’ची संख्या वाढविणार – शत्रुघ्न काटे
 
केंद्रीय पद्धतीने लसीकरणासाठी निवड झालेल्या नागरिकांस प्रमाणित करण्यात आलेल्या लसीकरणासाठी जाणे शक्य नाही झाल्यास संबंधित नागरिकांस पुनश्च: नव्याने टोकन घेऊन प्रतिक्षा यादीमध्ये आपले नाव समाविष्ठ करावे लागेल. लसीकरण केंद्रावरती नागरिकांना प्राप्त झालेला SMS अथवा KIOSK द्वारे देण्यात आलेली टोकन प्रत दाखवून त्याबाबतची खात्री झाल्यानंतरच लसीकरण करण्यात येईल. नागरिकांची होणारी गैरसोय विचारात घेता सद्यस्थितीत लसीकरण केंद्रावर देण्यात येणारी टोकन पद्धत बंद करण्यात येणार असून यापुढे सर्व लसीकरण KIOSKसंगणक प्रणालीद्वारे निर्गमित करण्यात येणाऱ्या टोकन पद्धतीनुसार राबविण्यात येणार आहे. तसेच KIOSK द्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या टोकन पद्धतीबाबत नागरिकांचा प्राप्त होणार प्रतिसाद विचारात घेऊन KIOSK ची संख्या ही वेळोवेळी वाढविण्यात येणार आहे, असे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती