'माझ्या भाषेत सांगायचे तर हे छा छु काम आहे,' कंत्राटदाराला उपमुख्यमंत्र्यांनी सुनावलं

शुक्रवार, 11 जून 2021 (13:16 IST)
पुण्याच्या पोलीस मुख्यालयातील एका वास्तूचे नूतनीकरण करण्यात आलं आहे. या नुतनीकरणाची पाहणी करण्यासाठी तसंच कोव्हिडमध्ये योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी अजित पवारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण यावेळी नुतनीकरणाच्या कामावरून अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना खडे बोल सुनावले.
 
अजित पवार नुतनीकरण करण्यात आलेल्या वास्तूची पाहणी करत होते, त्यावेळी नुतनीकरणाच्या कामातील त्रुटी त्यांना दिसल्या, त्यांनी त्याचवेळी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.
 
पवार म्हणाले, "मला अशा कामाला बोलवलं तर मी लई बारीक बघत असतो, माझ्या भाषेतच सांगायचं तर हे छा छु काम आहे. या ठेकेदारानं पोलिसांचेच काम असं केलंय तर बाकीच्यांचं काय?"
 
"बारामतीला येऊन बघा कसं काम केलंय," असंही ते यावेळी पोलीस आयुक्त आणि ठेकेदाराला म्हणाले.
 
यापूर्वी देखील अजित पवारांनी अनेकदा स्पष्ट शब्दात अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.
 
नंतर पत्रकार परिषदेच पत्रकारांनी याबाबत विचारल्यावर अजित पवार म्हणाले, "माझी मतं स्पष्ट असतात काही बारकावे माझ्या नजरेस येतात बाकी त्यांनी काम चांगलं केलं आहे."
 
'लांबून बोल आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह झालेत'
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोव्हिड सेंटर उभारण्यात येत होतं.
 
पिंपरीमधील 2 कोव्हिड सेंटरच्या जागेची पाहणी करण्यासाठी अजित पवार आले होते. त्यावेळी पवार यांच्याशी बोलायला मनसे नगरसेवक सचिन चिखले आले होते.
 
चिखलेंना देखील कोरोनाचे नियम पाळण्याबाबत पवारांनी चांगलंच खडसावलं होतं. "लांबून बोल, सोशल डिस्टनसिंग पाळा...आमचे चार मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत," असं पवार यांनी सुनावलं होतं.
 
पुण्यात आज (11 जून 2021) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या पत्रकारांना सुनावलं.
 
मेट्रोच्या कामाची पहाटे 6 वाजता पाहणी
गेल्या वर्षी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी अजित पवार पहाटे 6 वाजताच पोहोचल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
 
यावेळी पहाटेच मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आणि इतर अधिकारी, कर्मचारी हजर होते. पहाटेच पवार यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी करून पुढील बैठकांसाठी ते निघाले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती