पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरुच आहे. नऱ्हे येथील नवले पुल परिसरातील सेल्फी पॉईंट जवळ गुरुवारी झालेल्या विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, शुक्रवारी याच ठिकाणी आणखी एक भीषण अपघात झाला असून यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्री हा अपघात झाला असून एका टँकरने 13 सिटर ट्रॅव्हलरला जोराची धडक दिली. त्यामुळे ट्रॅव्हलर पलटी होऊन सर्व्हिस रोडवर पडली. यावेळी सेल्फी गार्डनमध्ये बसलेले काही नागरिकही जखमी झाल्याचे समजतेय. या अपघातामुळे वाहतुक विस्कळीत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.