अवाजवी बिले आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करावी; रूग्णांच्या नातेवाईकांसह नागरिकांची मागणी

मंगळवार, 4 मे 2021 (11:05 IST)
मागिल वर्षभरापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे उपचारासाठी रुग्णांसह नातेवाईकांची त्रेधातिरपीट उडत आहे. हॉस्पिटलच्या तुलनेत रुग्णांची संख्या वाढू लागल्याने भरमसाठ बिलांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यातून मेडिक्लेम कंपन्यांचे चोचले पुरविण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून भरमसाठ बिले आकारली जातात की काय, असा संशय वाढू लागला आहे. हडपसरमधील खासगी रुग्णालयामध्ये एका रुग्णाच्या वाढीव बिलामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. मेडिक्लेम कंपन्यांकडून बिल मंजूर करून घेण्यासाठी टक्केवारी द्यावी लागत असल्याची माहित सूत्रांनी दिली आहे. जिल्हाधिकारी प्रशासनाने खासगी रुग्णालयांनी दिलेल्या बिलाची चौकशी करून अवाजवी बिले आकारणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
 
कोरोनाच्या भीतीने नागरिकांची पुरती वाट लागली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर मिळत नाहीत, रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नाही. कुटुंबचे कुटुंब उद्धध्वस्त होत आहेत. या भीतीने नागरिक मिळेल त्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होत असल्याची संधी साधून खासगी रुग्णालयांकडून आर्थिक लूटमार करण्याचा गोरख धंदा सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी प्रशासनाने तातडीने अशा प्रकरणाची चौकशी करावी, तसेच प्रत्येक हॉस्पिटलमधील रुग्णांवर काय उपचार केले, त्याची बिले कशी आकारली आहेत, याची तपासणी केली पाहिजे. अन्यथा, खासगी रुग्णालयांकडून अशा प्रकारे रुग्णांची लूट थांबणार नाही, असा सूर हडपसरमधील अभ्यासकांनी आळवला आहे.
 
पुण्यामधील (हडपसर) उषाकिरण हॉस्पिटलमध्ये सुमन सिंग (रा. बी.टी. कवडे रस्ता, तारादत्त कॉलनी, हडपसर) यांना 17 एप्रिल रोजी साडेपाचच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले. हॉस्पिटलने वीस हजार रुपये अनामत रक्कम जमा करून घेतली, त्यानंतर 45 हजार रुपयांची औषधे बाहेरून आणण्यास सांगितले. रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर बिलाची सविस्तर माहिती मागितली. मात्र, ती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे रुग्णाच्या भावाची आणि डॉक्टरांची शाब्दिक चकमक छाली. त्यानंतर फार्मसीचे एक लाख 30 हजार 947, तर ऑक्सिजन बायमास 12 हजार रक्कम बिलामध्ये लावलेली दिसून आली. दरम्यान मेडिक्लेमचे एक लाख 47 हजार 697 रुपये मंजूर झाल्याचे दिसून आले. मात्र, त्यामध्ये अनामत रक्कम म्हणून वीस हजार आणि 45 हजार रुपयांची औषधे आणून दिली होती, त्याचा उल्लेख नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले. हा गैरप्रकार असल्याने विजय सिंग यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. रुग्णाला ऑक्सिजन लावला नाही, तरीसुद्धा बिलामध्ये त्याचे बील लावले आहे, त्यामुळे रुग्णालयाने दिलेल्या बिलाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, हडपसरमधील उषाकिरण हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क होऊ शकला नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती