मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एका अधिकाऱ्याला दोन अपत्यांचा नियम मोडल्याच्या आरोपाखाली सेवेतून काढून टाकण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त दर्जाचे अधिकारी श्रीनिवास दांगट यांना त्यांच्या तिसऱ्या मुलाबद्दल माहिती लपवल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर त्यांची नोकरी गमवावी लागली. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत दोन अपत्यांचे नियम उल्लंघन केल्याबद्दल अधिकाऱ्याला दोषी ठरवण्यात आले. विशेष म्हणजे दांगट यांच्या निवृत्तीच्या फक्त एक महिना आधी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. पीसीएमसी आयुक्त शेखर सिंह यांनी 7 जानेवारी रोजी पीसीएमसीच्या सामाजिक विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना बडतर्फ करण्याचा आदेश जारी केला होता. बुधवारी दांगट यांनी दावा केला की त्यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलाबद्दल कधीही कोणतीही माहिती लपवली नाही आणि ते त्यांच्या बडतर्फीविरुद्ध संबंधित अधिकृत अधिकाऱ्यांकडे अपील करतील असे सांगितले. महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाची घोषणा) नियम, 2005 अंतर्गत दोन अपत्यांचे नियम उल्लंघन केल्याबद्दल दांगट दोषी आढळल्याचे आदेशात म्हटले आहे. पीसीएमसी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दांगट यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यानंतर अंतर्गत चौकशी करण्यात आली.