आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मंगळवार, 13 एप्रिल 2021 (15:41 IST)
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी याप्रकरणी बोगस डॉक्टराला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधिच बोगस डॉक्टरचं खरं नाव महमूद शेख असं आहे. तो कारेगाव भागात श्री मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवत होता. तिथे तो स्वत:चं नाव डॉ. महेश पाटील असं वापरत असे. विशेष म्हणजे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात संबंधित बोगस डॉक्टर हा फक्त बारावी पास असल्याचं समोर आलं आहे. तो गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हॉस्पिटल चालवत होता
 
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा बोगस डॉक्टर 22 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत होता. मात्र, पोलिसांनी त्याच्या रुग्णालयावर छापा टाकून त्याची लबाडी चव्हाट्यावर आणली. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पोलिसांच्या मध्यस्तीने भांडण सोडवण्यात आलं. बोगस डॉक्टरवर रांजणगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सर्व कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी इतरस्त्र हलवण्यात आले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती