करोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेशोत्सवादरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती सध्या प्रसारित केली जात आहे. मात्र पुण्यात असे कोणतेही नवे निर्बंध लागू केले नसल्याचं पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितलं आहे.
पुणे शहरामध्ये १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत १४४ कलम लावण्यात आलं आहे. पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी, प्रार्थनास्थळंबंद ठेवण्यासंबंधी तसेंच संचारास मनाई करणारे आदेश लागू केले आहेत, अशी माहिती विविध माध्यमांद्वारे समोर येत होती. मात्र ह्यात काहीही तथ्य नसल्याचं प्रत्यक्ष शिसवे यांनीच सांगितलं आहे. तसंच पुणेकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याच आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
मानाच्या गणेश मंडळांसह सर्व सार्वजनिक मंडळांच्या वतीने यंदाही उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना शुक्रवारी (१० सप्टेंबर) दुपापर्यंत होणार आहे. प्रतिष्ठापनेआधी मिरवणूक निघणार नसली, तरी या गणपतींचे दर्शन ऑनलाइन माध्यमातून घेता येणार आहे. मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम यांच्या फेसबुक पेजवर, तर तुळशीबाग मंडळाच्या यूटय़ूब पेजवर प्रतिष्ठापनेचा सोहळा आणि श्रींच्या दर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.