दहावीच्या परिक्षेत39 टक्के इतके कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून दहावी उत्तीण झालेल्या सोळा वर्षीय विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या धक्कादायक घटना चर्होली फाटा येथील एका सोसायटीत घडली.सुप्रजा हरी बाबू असे या मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती पुण्यातील चऱ्होली फाटातील एका सोसायटीत राहते. तिचे वडील बँकेत कामाला आहे. ती आई, वडील बहीण आणि भावासह राहत होती.
मंगळवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा आणि सीबीएसईचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. सुप्रजा हिने 10 वीची परीक्षा दिली होती. तिने दुपारी एकच्या सुमारास मोबाईलवर निकाल पहिला. निकालात तिला परीक्षेत 39 टक्के गुण मिळाल्याने ती नैराश्यात गेली आणि काही वेळातच ती शयनगृहात गेली.
बराच वेळ झाल्यावर तिची आई तिला शयनकक्षात बघायला गेली असता ती साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेली दिसली. हे पाहता आईने टाहो फोडला. आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी घटनास्थळी धावले आणि ताबडतोब पोलिसांना कळविले. तो पर्यंत रहिवाशांनी तिला खाली उतरवले आणि बेशुद्धावस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उशीर झाला होता. तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.