पुण्यात ‘कोरोना’ची स्थिती चिंताजनक ! 4849 नवे पॉझिटिव्ह तर तब्बल 65 जणांचा मृत्यू

मंगळवार, 13 एप्रिल 2021 (11:08 IST)
राज्यात  कोरोना रुग्णांची वाढत असताना मृत्यूची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या महत्त्वाच्या शहरामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून 4 हजारांच्या वर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी  पुणे शहरामध्ये 22 हजार 466 स्वॅब तपासणी करण्यात आली. यामध्ये 4 हजार 849 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
 
पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.  पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 34 हजार 510 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 53 रुग्ण शहरातील आहेत तर 12 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 5 हजार 801 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 
 
दरम्यान 3 हजार 896 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 75 हजार 333 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात सक्रिय रुग्ण संख्या 53 हजार 376 इतकी आहे. त्यापैकी 1050 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत 6 लाख 48 हजार 393 रुग्णांपैकी 5 लाख 39 हजार 430 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण 98 हजार 345 आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती