भाटघर धरणात 5 तरुणी बुडाल्या

शुक्रवार, 20 मे 2022 (13:20 IST)
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भाटघर धरणात बुडून गुरुवारी संध्याकाळी पाच तरुणीचा मृत्यू झाला. सह्याद्री रेस्क्यू टीम, भोईराज जल आपत्ती पथक आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या पाचही तरुणींचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले असून मृतदेह पाण्यातून काढण्यात आले आहे.  
 
भाटघर जवाळील नरेगावात पुण्याहून आलेल्या तरुणीआपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या.त्यांचा पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. खुशबू लंकेश राजपूत(19), मनीषा लखन बीनावत (20), चांदणी शक्ती बीनावत (21), पूनम संदीप बीनावत (22) आणि प्रतिभा रोहीत चव्हाण(23) असं धरणात बुडालेल्यांची नावं आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, या पाचही तरुणी आणि नऊ वर्षाची मुलगी अशा सहा जणी भाटघर धरण परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास भाटघर धरणाच्या शेजारी पाण्याजवळ फोटो घेण्यासाठी गेल्या होत्या. तिथे फोटो काढताना चांदणी बीनावत या तरुणीचा पाय घसरून ती पाण्यात पडून बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी इतर चौघी देखील पाण्यात उतरल्या आणि पाहता- पाहता त्या पाण्यात बुडाल्या. नऊ वर्षाची मुलगी काठावर असल्यामुळे बचावली. तिनेच घरच्या फोनवर फोनकरून ही माहिती दिली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 
 
स्थानिकांच्या मदतीने त्यांना शोधण्याचे काम उशिरा पर्यंत सुरु होते. पाच पैकी तिघींचे मृतदेह गुरुवारी सापडले, तर इतर दोघींचे मृतदेह रात्री उशिरा मिळाले. स्थानिक पोलिसांनी घटनेची नोंत केली असून प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती