अक्षय तृतीयेला दरवर्षी मंदिरात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आरास व पुष्परचना करण्यात येते. मात्र, यावर्षी कोविडच्या पार्श्र्वभूमीवर अत्यंत साधेपणाने ही आरास करण्यात आली. देसाई बंधू आंबेवाले चे मंदार देसाई यांनी दरवर्षीप्रमाणे आंबे देऊन श्री चरणी सेवा अर्पण केली.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. परंतु दरवर्षीप्रमाणे आंब्यांची आरास मंदिरात करण्यात आली आहे. गणरायाला नैवेद्य दाखवलेला हा आंब्यांचा प्रसाद ससून रुग्णालयातील रुग्ण, पिताश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ आणि खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रातील सैनिकांना देण्यात येणार आहे.
मंदिर बंद असले तरीही दैनंदिन धार्मिक विधी मंदिरात सुरु आहेत. भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.