Sundareshwar Temple मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर

शनिवार, 17 डिसेंबर 2022 (23:12 IST)
मीनाक्षी मंदिराच्या उत्तरेला सुंदरेश्वर मंदिराचा गोपूर आहे. सुंदरेश्वर मंदिराच्या चारीही बाजूला गोपूर आहेत. त्यावर हिंदू देवदेवतांच्या, पशूपक्ष्यांच्या मूर्ती आहेत. प्रत्येक गोपूर नऊ मजली आहे. त्याचे प्रवेशद्वारे वीस मीटर उंच आहते. कुंबथडी मंडपममध्ये शंकरासह अनेक देवदेवतांच्या तसेच ऋषिमुनींच्या प्रतिमा आहेत. जवळजवळ एका कक्षात मीनाक्षी व सुंदरेश्वरजी यांची वाहने आहेत. येथेच चांदीत मढवलेला हंस व नंदी आहेत. तेथून थोड्या अंतरावर मदुराईचा राजा विश्वनाथ नायक याचा मंत्री आर्य नायक मुठलीच्या काळात बनविलेला सहस्त्रस्तंभ मंडप आहे. यात एकूण 185 स्तंभ आहेत. यावरही देवदेवता, नृत्यांगना, योद्धे यांच्या प्रतिमा आहेत.
 
या मंदिराला चार दारे आहेत. प्रवेशद्वारावर गणपतीची मोठी प्रतिमा आहे. या मंदिराबाबत एक दंतकथा आहे. मलायाराजा पंड्या निपुत्रिक होता. म्हणून राजा व राणीने एक यज्ञ केला. यावेळी अग्नीतून तीन वर्षीय बालिका प्रकट झाली. ती होमातून बाहेर पडून थेट राणी कंचनमालाकडे गेली. मोठी झाल्यानंतर या राजुकमारी मीनाक्षीने मोठा पराक्रम गाजवला. 
 
आजूबाजूच्या सर्व राजांना पराभूत करून तिने स्वत:चा एकछत्री अंमल प्रस्थापित केला. त्यानंतर कैलास पर्वतावर जाऊन शंकराची आराधना केली व त्याला पती म्हणून मिळविण्यात ती यशस्वी ठरली. मीनाक्षी मंदिराच्या जवळच सुवर्ण पुष्करणी नावाचे सरोवर आहे. त्याच्या बाजूला सुंदर हिरवाई आहे. फेब्रुवारी महिन्यात मीनाक्षी व सुंदरेश्वर यांच्या मूर्तीला येथे आणून या सरोवरता स्नान घातले जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती