मला आता देशाची चिंता आहे. मी आतापर्यंत देशासाठी लढत आलो, या पुढेही मी एक सैनिक म्हणूनच लढा देईल. देशातील राजकीय जंगलात चालेल्या घोडेबाजारापासून आता देशाला कोणीही वाचवू शकणार नाही'
पाकचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे राजीनामा देणार का? या विषयाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सध्या पाकमध्ये सुरू असतानाच आता मुशर्रफ यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात अत्यंत भावुक होत आपण केलेल्या कामाचा पाढा वाचत आणि विरोधकांना कानपिचक्या देत अखेर आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
आज एक वाजता मुशर्रफ यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली.सुमारे तसाभर त्यांचे भाषण चालले. या भाषणात मुशर्रफ काही प्रसंगी अत्यंत भावुक झाले होते. आपण खऱ्या अर्थाने 1995 नंतर पाकला नवी ओळख मिळवून दिली. तोपर्यंत पाकला कोणीही ओळखत नव्हते पाकला आंतरराष्ट्रीय राजकारणात काडीचेही महत्त्व नव्हते.
अशा वेळी मी सत्ता हातात घेतल्यानंतर आज पाक आंतरराष्ट्रीय क्षेत्रात एक महत्त्वाचा देश मानला जात असल्याचे मुशर्रफ यांनी सांगितले.
पाकमध्ये आपण आर्थिक विकास तर केलाच परंतु याच सोबत आपण देशातील प्राथमिक गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला. देशातील तरुण भरकटले होते, त्यांना शिक्षण काय याचा गंधही नव्हता, अशा वेळी देशातील तरुण आणि शिक्षणाचा विस्कळीत झालेला गाडा आपणच पूर्वपदावर आणल्याचे ते म्हणाले.
मी पाकच्या जनतेला आतापर्यंत राजकारण्यांच्या या जंगलातून अनेकदा वाचवले आहे, हे राजकारणी केवळ स्वतः:चाच स्वार्थ पाहतात. त्यांनी पाकची ओळखच बदलून दिली, नुकसान म्हणजे पाकिस्तान अशी ओळख त्यांनी जगाला पाकची करून दिली. हे चुकीचे असून मला राजकारण्यांविरोधात काही कट करायचेच असते तर मी निवडणुकाच होऊ दिल्या नसत्या. आतापर्यंत कधीही झाल्या नसतील इतक्या पारदर्शक निवडणुका मी देशात शांतीपुर्ण पद्धतीने घेतल्याचे मुशर्रफ म्हणाले.
मी सत्ताधाऱ्यांविरोधात कट रचतो असा आरोप माझ्यावर केला जातो, पण असे असते तर पाकमध्ये मी लोकशाहीची स्थापनाच होऊ दिली नसल्याचे ते म्हणाले. मला गेल्या आठ वर्षात असलेल्या अनुभवाचा फायदा सरकारने करून घेण्याऐवजी ते मला पाकपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत असून मी त्यांना समस्या सोडवणारा नाही तर समस्याच वाटत आहे.
मला माझ्यावर विश्वास आहे, मी केलेल्या कामावर मला विश्वास आहे, म्हणूनच मी आज ठणकावून सांगतो की मी माझ्यापेक्षा माझ्या देशाला अधिक महत्त्व दिले आहे, म्हणून माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल होणे अशक्यच असल्याचे मुशर्रफ यांनी ठणकावून सांगतानाच धर्म आणि गरिबीचा उल्लेख आपल्या भाषणात करत सामान्यांचे आपल्या विरोधातील मत बदलण्याचा प्रयत्नही केला.
अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकसह जगभरात धर्माचे नाव बदनाम झाले आणि आत्मघाती हल्ल्यांची नवी संस्कृती उदयास आली, याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आता पाकमध्ये स्थिरता हवी आहे, आणि ति देशात हवी असल्याने सर्वांनी एकत्र येण्याची गरजही मुशर्रफ यांनी व्यक्त केली.
पाकवर माझे प्रेम आहे, मी गेल्या 44 वर्ष आपले प्राण धोक्यात घालून देशाचे रक्षण केले आणि यापूढेही करत राहीन, काही अनेक विचार आपल्या मनात आहेत, मला आता देशाला घोडे बाजारापासून वाचवायचे आहे. आपल्या भाषणाच्या अखेरीस अत्यंत भावूक होत मुशर्रफ यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
आता मुशर्रफ कोठे जाणार?
आपला राजीनामा दिल्यानंतर आता मुशर्रफ नेमके काय करणार आणि सरकार त्यांच्याविरोधात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुशर्रफ आता आश्रयाला पाकिस्तानबाहेर पळण्याची शक्यता असल्याने सरकाने त्यांच्या भोवती आपले सुरक्षा रक्षक पेरल्याची बातमी आहे. मुशर्रफ यांना आश्रय देण्याचा प्रश्नच नसल्याचे अमेरिका आणि ब्रिटनने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर ते चीन किंवा सऊदीत आश्रय घेऊ शकतात असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
पाकमध्ये जल्लोष सुरु
राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी आपल्या भाषणात राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच पाकमध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. मुशर्रफ यांच्या भाषणाच्या शेवटी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर करताच लाहौरच्या प्रमुख चौकात मुशर्रफ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अनेकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.