धारावी 'सेलिब्रेशन मूड' मध्ये

भाषा

सोमवार, 23 फेब्रुवारी 2009 (14:17 IST)
मुंबईची प्रसिद्ध धारावी झोपडपट्टी आज नेहमीप्रमाणे लवकर उठली तरी कामाला लागली नव्हती. घरोघर लागले होते ते टिव्ही. आणि एकामागोमाग एक घोषणा होऊ लागल्या तसा या झोपडपट्टीवासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि सरतेशेवटी 'फॉर बेस्ट पिक्चर कॅटेगरी ऑस्कर गोज टू...'साठी 'स्लमडॉग मिलनियर'चे नाव घोषित झाले आणि या झोडपट्टीवासियांनी नाचत गात आनंद साजरा केला. धारावीवासियांचे दरिद्री जीवन नेमकेपणाने मांडणार्‍या या चित्रपटामुळे त्यांचे जगणे आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले होते.

या चित्रपटाला ऑस्कर मिळाल्याचा आनंद आम्ही साजरा करणार आहोत. त्यासाठी रात्री पार्टी ठेवली आहे. लोक तर सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत, असे अझर शेख हा धारावीत गेल्या दशकापासून रहाणारा तरूण म्हणाला. स्लमडॉग हा चित्रपट पूर्णपणे धारावीवर बेतला आहे. याच झोपडपट्टीत रहाणार्‍या रूबिनाने या चित्रपटात लतिकाच्या लहानपणीची भूमिका केली आहे. सध्या ती ऑस्करसाठी अमेरिकेत गेली आहे. तिचे कुटुंबिय आता तिच्या येण्याची वाट पहात आहेत. ती आल्यानंतर तिला घेऊन येण्यासाठी आम्ही सर्व जाऊ असे तिचे वडिल रफीक म्हणाले. तिच्या घराच्या आजूबाजूचा माहोल सध्या ऑस्करमय झाला आहे.

धारावी ही आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. तीत एका स्वेअर किलोमीटर भागात लाखभर लोक रहातात. यात अस्वच्छता, नागरी सुविधांची हेळसांड आणि गुन्हेगारी असे सारे काही सुखनैव नांदते आहे. याचेच चित्रण चित्रपटात आहे.

वेबदुनिया वर वाचा