मुष्टियुद्धात अखिल कुमारने जगज्जेत्याला हरवले

वार्ता

शनिवार, 16 ऑगस्ट 2008 (18:04 IST)
स्वातंत्र्यदिनी देशाला यशाची भेट देणार असे वचन मुष्टियोद्धा अखिल कुमारने दिले होते. आज त्याने ऑलिंपिकमध्ये विश्वविजेता रशियाच्या सर्गेई वोदापेनोव्हला हरवून आपले वचन पाळले. या कामगिरीमुळे अखिल कुमार उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.

अखिल कुमारने ५४ किलो वजनी गटात दुसर्‍या फेरीतील लढतीत वोदोपेनोव्हला अस्मान दाखवले. ही लढत अतिशय चुरशीची झाली. दोघांचा गुणफलक १-२,३-४,३-२ व २-१ असा होता. चार फेर्‍यांनंतर दोन्ही मुष्टियोद्धे ९-९ अशा बरोबरीवर होते. पण परीक्षकांनी अखिल कुमारला विजेता घोषित केले. आपल्या पराजयाचा निकाल ऐकून वोदोपेनोव्हला रिंगमध्येच त्याला रडू आवरले नाही.

वास्तविक अखिल कुमारची सुरवात चांगली नव्हती. दोन फेर्‍यानंतरही तो मागे पडला होता. पण शेवटच्या दोन फेर्‍यांत त्याने कसर भरून काढून लढत बरोबरीवर आणली. आता उपांत्य फेरीत त्याची गाठ मोलदोव्हा प्रजासत्ताकाच्या विक्सलोव्ह गोजनशी पडेल.

अखिल कुमार आज लढतीसाठी रिंगमध्ये उतरल्यानंतर सगळ्याच गोष्टी त्याला प्रतिकूल होत्या. पण दिवस आपला असेल तर दुसरा कोणीही आपल्यापुढे टिकू शकणार नाही, असे त्याने म्हटले होते. ते अखेरीस खरे ठरले. आजचा दिवस त्याचाच होता. पहिल्या फेरीत अखिल व वोदोपेनोव्ह दोघेही सावधगिरी बाळगून खेळत होते. पहिली व दुसरी फेरीही वोदोपेनोव्हने जिंकली. तिसर्‍या फेरीत मात्र अखिल कुमारने जोरदार पुनरागमन केले. ही फेरी त्याने ३-२ अशी जिंकली. शेवटच्या फेरीतही अखिल मागे पडला होता. पण त्यानंतर जगज्जेता वोदोपेनोव्ह बचावात्मक खेळू लागला. ही संधी साधून अखिल कुमारने जोरदार आक्रमण केले. त्याने एक जोरदार फटका जगज्जेत्याच्या थोबाडावर हाणला. त्यानंतर आणखी एक जोरदार ठोसा मारून त्याने या जगज्जेत्याला २-१ असे माघारी धाडले.

आता दोघांचाही स्कोअर ९-९ असा झाला होता. पण पाच परीक्षकांच्या पॅनेलने अखिलने सर्वाधिक पंच मारले म्हणून त्याला विजेता घोषित केले. हा निकाल ऐकून रशियन पैलवानाला रडू आवरले नाही.

विजयाच्या आनंदाने अखिल कुमारही उत्तेजित झाला होता. 'माझे स्वप्न सुवर्णपदकाचे आहे. मी ते मिळविन की नाही, हे नशीबावर अवलंबून आहे. पण माझ्याकडूनही मी कठोर परीश्रम करतो आहे, असे तो म्हणाला. पुढची फेरी कठीण असल्याचे सांगून अर्थात असे असले तरी माझा प्रयत्न सुवर्णपदक जिंकण्याचाच आहे, असे त्याने सांगितले.

गेल्या ऑलिंपिकमध्ये अखिल कुमार पहिल्याच फेरीत बाद झाला होता. २००६ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते.

वेबदुनिया वर वाचा