मध्यरात्री उजळून निघाला भारत

वार्ता

गुरूवार, 14 ऑगस्ट 2008 (14:02 IST)
ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे नाव सुवर्ण अक्षरात कोरणाऱ्या अभिनवने मायभूमीतच स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेत काल नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाऊल ठेवले आणि त्याने केलेल्या कामगिरीने संपूर्ण देशच जणू मध्यरात्रीच्या काळोखात प्रकाशमान झाला.

अभिनव काल बीजिंगवरून भारतात परतल्यानंतर त्याचे रात्री जोरदार स्वागत करण्यात आले. राजधानीत इंदिरा गांधी विमानतळावर क्रिकेट वगळता अभिनव पहिला असा खेळाडू आहे की, ज्याच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने त्याचे चाहते स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते.

त्याचे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी विमानतळावर जोरदार ढोलताशांचा गजर झाला. रात्री एक वाजता एअर चायना विमानाने परतलेल्या अभिनवने धावपट्टीवर पाऊल ठेवताच त्याच्या चाहत्यांनी त्याच्या नावाच्या जोरदार घोषणा दिल्या.

मला मातृभूमीत येण्याची ओढ लागल्याचे त्याने यानंतर प्रसारमाध्यमांशी प्रतिनिधींना सांगितले, तर अभिनवने आपल्याला राखीची ही भेट दिल्याचे अभिनवची बहीण चित्रा कपूरने स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा