दोन हजारात नोव्हा नेट पीसी

रविवार, 4 जानेवारी 2009 (14:51 IST)
येत्या काही वर्षात नऊ दशलक्ष ब्रॉडबँड कनेक्शन जोडणीचे लक्ष्य गाठण्यासाठी भारत संचार निगम लि आणि चेन्नईची नोवाटियम ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली कंपनी एकत्र आले आहेत. नोवाटियमने अतिशय स्वस्त असं होम कॉम्प्युटिंग उपकरण विकसित केलं आहे.

नोवा नेटपीसी हे उपकरण आज बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलं. ब्रॉडबँड जोडणीकरता महागडा डेस्कटॉप किंवा लॅपटॉप घेण्याची आवश्यकता नोवा नेटपीसी मुळे भासणार नाही.

नोवा नेटपीसी सोबत सेट टॉप बॉक्स, कीबोर्ड आणि माऊस देण्यात येईल पण कॉम्प्युटर हार्डवेअर प्रणालीचं व्यवस्थापन सेंट्रल सर्व्हरवरून केलं जाईल. सर्व प्रकारची अँप्लिकेशन्स नोवा नेटपीसी धारकांना वापरता येतील. सेंट्रल सर्व्हर बीएसएनएलच्या ब्रॉडबँडशी जोडलेला आहे.

नोवा नेटपीसी दोन पॅकेज मध्ये उपलब्ध आहे.
त्यापैकी एक आहे, 1999 रूपये डाऊन पेमेंट आणि मासिक शुल्क फक्त 199 रूपये तर दुसरं पॅकेज आहे 2999 रूपये डाऊन पेमेंट आणि 175 मासिक शुल्क फक्त. नोवा नेटपीसीमुळे इंटरनेट कनेक्शनसाठी 20 ते 50 हजार रूपयांपर्यंतचा डेस्कटॉप कॉम्प्युटर घेण्याची अजिबात आवश्यकता नाही

नेट पीसीला 11 जागतिक पेटंटस मिळाली आहेत. गेल्या एका वर्षापासून ते दिल्लीमध्ये वापरलं जातंय. दिल्लीव्यतिरिक्त मॉरीशसमध्येही उपलब्ध झालं आहे. जानेवारी अखेरीस 1000 युनिट्स विक्रीचं लक्ष्य नोवानेट पीसीने ठेवलं आहे. नोवानेट पीसीमुळे सुलभ आणि परवडण्याजोगं ब्रॉडबँड सेवा देशाच्या कानाकोपरयात पोहोचवता येईल.

वेबदुनिया वर वाचा