सप्तशृंगी निवासिनी देवीचे स्थळ असलेल्या सप्तश्रृंगगड भाविकांच्या गर्दीने असाच ओसंडून वाहात असतो. नवरात्रोत्सव व सुट्टीच्या काळात तर ही संख्या दररोज लोखोंच्या घरात पोहोचते. नाशिकपासून 70 किलोमीटर अंतरावर हा गड आहे. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी 10 किलोमीटरचे अंतर कापावे लागते. ज्या पर्यटकांना गडावर पायी मार्गक्रमण परावयाचे आहे, त्यांच्यासाठी रडतोंडीचा या घाटमार्गाचा पर्याय खुला असतो. सणोत्सवाच्या काळात गडावर वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून खासगी वाहनांना प्रवेश बंद केला जातो. परंतु, त्या वेळी सलग चोवीस तास बससेवेची व्यवस्था केलेली असते. विश्वस्त मंडळाने गडावर विविध सुविधा निर्माण केल्या असून पर्यटकांसाठी 250 खोल्यांचे भक्त निवास आहे. तसेच प्रसादालयात दहा रुपये नाममात्र दरात भोजनाची व्यवस्था आहे. एकाच वेळी 500 जणांपुरती मर्यादित असणारी ही व्यवस्था लवकरच 3400 पर्यंत विस्तारली जात आहे.